। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन येथील वाणी आळीतील रहिवासी अजीत शापुस्कर यांच्या निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने नारळीपोर्णिमा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पुरोहित श्रेयश जोशी यांच्या हस्ते देव्हार्यातील मानाच्या सहा नारळांचा पूजाविधी संपन्न झाला. तद्नंतर पोलिस उपविभागीय अधिकारी विवेक मुळगीकर, प्रांतधिकारी महेश पाटील, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे, मंडळ अधिकारी कल्याण देऊळगावकर यांच्या हस्ते मानाच्या नारळांची पूजा करण्यात आली.
श्रीवर्धन येथील श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे व मुरूडच्या नबाबाचे संस्थान अस्तित्वात होते त्या काळापासून नारळीपोर्णिमेसह दसरा, धुलीवंदन हे सण मोठ्या उत्साहाने साजरे होत असे. या सणांसाठी पेशवे व नबाबाकडून मानधन दिले जात होते. तसेच, नारळीपोर्णिमेच्या दिवशी मान्यवरांच्या हस्ते नारळांचे पूजा विधी संपन्न होत. कालांतराने तहसील कार्यालयात नारळीपोर्णिमेच्या दिवशी तहसीलदारांमार्फत नारळाचे पूजाविधी व समाज प्रतिनिधींना मानाचे पान-सुपारी दिली जायची व नारळ मान सन्मानाने समुद्रात अर्पण केला जायचा. पंरतु, काही कारणास्तव हे सण तहसील कार्यालयाकडून साजरे होणे खंडीत झाले होते. काही वर्षांपूर्वी वाणी आळी येथील उद्योजक स्व.विनायकभाई मापुस्कर यांनी पेशवेकालीन सण आपल्या निवासस्थानी साजरे व्हावे, असा प्रस्ताव शहरातील सर्व समाज प्रतिनिधींसमोर ठेवला होता. प्रतिनिधींचा प्रतिसाद मिळाल्यानंतर सर्व सण मापुस्करांच्या निवासस्थानी साजरे होऊ लागले.
सोमवारी (दि.19) मापुस्कर यांच्या निवासस्थानी परंपरेप्रमाणे नारळीपोर्णिमा सण उत्साहाने साजरा करण्यात आला. यजमान अधिकारी वर्गाने मापुस्कर कुटुंबीयांसह समाज प्रतिनिधींना मानाचा फेटा, मानाची टोपी, विडापान देत मानसन्मान केला. सायंकाळी खालु बाजा वाद्याच्या गजरात नारळाची मिरवणूक काढण्यात आली व नारळ अधिकारी वर्गाच्या हस्ते समुद्रात अर्पण करण्यात आला. यावेळी समुद्र किनार्यावर चॅम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन युध्दाची प्रात्यक्षिके दाखविली.