। मुंबई । वृत्तसंस्था ।
महिलासंबंधी गुन्हे रोखण्यात शासन अपयशी झाल्याची टिका भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. तालुक्यातील जवळे येथील अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाची वाघ यांनी भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी ही टिका केली आहे.
यासमयी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, भाजपचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, सामाजिक कार्यकर्ते रामदास घावटे, कृष्णकांत बडवे, नगर शहराध्यक्ष भैया गंधे, नवनाथ सालके, अमोल मैड, बबनराव आतकर, महेंद्र आढाव, शेखर सोमवंशी, जवळ्याच्या सरपंच अनिता आढाव, सोनाली सालके, गजानन सोमवंशी, प्रभाकर घावटे आदी उपस्थित होते. याप्रसंगी तालुक्यातील जवळे येथील अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांकडे भारतीय जनता पक्षाच्या वतीने एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश त्यांनी सूपूर्द केला.
वाघ म्हणाल्या की, राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेतून अत्याचार झालेल्या महिलांना,मुलींना आर्थिक मदत करण्यात येते. त्याच धर्तीवर अत्याचार व हत्या झालेल्या महिला व मुलींच्या कुटुंबीयांना सरकारने मदत मदत द्यावी. या घटनेला सहा दिवस झाले तरी अद्याप गुन्हेगारांचा शोध लागला नाही ही चिंतेची बाब आहे.
आरोपींचा तत्काळ शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा होईल अश्या पध्दतीने तपास करण्याची मागणी वाघ यांनी केली. पीडितेच्या घराच्या परिसरात राहणार्या कोणालाच या प्रकाराबाबत काही माहिती नाही का, शेजार्यावर कोणाचा दबाव आहे का? कोणी दहशत निर्माण केली आहे का, अशी शंका श्रीमती वाघ यांनी व्यक्त केली आहे.