आरोग्य केंद्राला टाळे! डॉक्टर-परिचारिका नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय

13 लाख 60 हजारांची इमारत धूळ खात

| आपटा | प्रतिनिधी |

गावकऱ्यांच्या आरोग्याची सोय व्हावी म्हणून उभारण्यात आलेले प्राथमिक आरोग्य उपकेंद्रच सध्या बंद असल्याने गुळसुंदे परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 21 फेब्रुवारी 2010 रोजी सुरू करण्यात आलेल्या या आरोग्य उपकेंद्रासाठी गणपती देवस्थानने जागा दान केली. त्यानंतर तब्बल 13 लाख 60 हजार रुपये खर्चून सुसज्ज इमारत उभी करण्यात आली; मात्र डॉक्टर आणि परिचारिका उपलब्ध नसल्याने ही इमारत असूनही ग्रामस्थांना उपचारासाठी इतर ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या आरोग्य व्यवस्थेबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

गुळसुंदे, आकुळवाडी आणि लाडवली या तीन गावांतील नागरिकांना या आरोग्य उपकेंद्राचा मोठा आधार मिळू शकतो. मात्र, केंद्रासाठी जागा, इमारत आणि आवश्यक सुविधा उपलब्ध असतानाही आरोग्य कर्मचारीच उपलब्ध नसल्याने केंद्राचा उपयोग काय? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे. ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी देवस्थानने जागा दान केली. शासनाच्या निधीतून लाखो रुपये खर्च करून इमारतही उभी राहिली. मात्र, डॉक्टर आणि परिचारिकांच्या नियुक्तीअभावी आरोग्य केंद्र बंद असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा खर्च वाया जात असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. विशेषतः रात्री-अपरात्री एखाद्या नागरिकाला तातडीची आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यास उपचारासाठी दूरच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होण्याबरोबरच गंभीर परिस्थितीत रुग्णाच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो.

कायमस्वरूपी डॉक्टर, परिचारिकेची मागणी
या आरोग्य उपकेंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर आणि परिचारिका उपलब्ध करून द्याव्यात, तसेच नियमित औषधसाठा उपलब्ध करून देऊन प्रत्यक्ष उपचाराची सुविधा सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रश्नाकडे जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर तसेच संबंधित जिल्हा परिषद सदस्य अनन्या अविनाश गाताडे यांनी तातडीने लक्ष देऊन आरोग्य उपकेंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
लाखोंची इमारत उपयोगाविना
जागा दान मिळाली, लाखो रुपये खर्चून इमारत उभी राहिली; मात्र डॉक्टरच नाहीत. त्यामुळे शासनाच्या आरोग्य सुविधांचा नेमका लाभ ग्रामस्थांना कधी मिळणार, असा सवाल उपस्थित होत आहे. गुळसुंदे आरोग्य उपकेंद्राला पुन्हा टाळे लागण्याऐवजी येथे कायमस्वरूपी वैद्यकीय सुविधा सुरू करून तीनही गावांतील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच उपचार मिळावेत, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Exit mobile version