। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अलिबाग अंतर्गत चालविण्यात येणार्या चिखली विभागात सध्या सुरू असलेल्या पोषण महा अभियानाअंतर्गत नवीन वाघविरा, वाघविरा, कुसुंबळे आदिवासीवाडी, हेमनगर, चिखली, चिखली आदिवासीवाडी, कुसुंबळे, टोसवाडी, पिटकिरी, काचळी, कातळपाडा, खजरीवाडी, मेढेखार इत्यादी अंगणवाड्यांमध्ये पर्यवेक्षिका भाग्यश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात सुदृढ बालक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी वजन, उंची, लसीकरण, आरोग्य, स्वच्छता इत्यादी बाबी विचारात घेऊन अंगणवाडीतील 6 महिने ते 3 वर्ष तसेच 3 वर्ष ते 6 वर्ष वयोगटातील बालकांसाठी सुदृढ बालक स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रत्येक गटातून तीन नंबर काढण्यात आले व विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. पालकांमध्ये व मुलांमध्ये उत्साह निर्माण झाला आला होता. कार्यक्रम आयोजित करण्यामागचा मुख्य उद्देश बालकांच्या संपूर्ण शारीरिक वाढीसाठी मुलांना द्यावयाचा सकस आहार, लसीकरण, गरोदरपणात तसेच स्तनदा मातांनी घ्यावयाची काळजी याबाबत विशेष जनजागृती करणे हा होता.
तसेच या स्पर्धेसाठी पालकांनी विशेष करून खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला व प्रत्येक अंगणवाडीत यशस्वीरित्या स्पर्धा राबविण्यात आल्या. अंगणवाड्यांमध्ये अशाप्रकारे वेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात याचे विशेष करून पालकांनी कौतुक केले. सर्वांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविल्याबद्दल उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील, पर्यवेक्षिका भाग्यश्री पाटील यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे विशेष कौतुक केले.