| रसायनी | वार्ताहर |
घोसाळवाडी हिरानंदानी वसाहतीतून सोडण्यात येणारे सांडपाणी पानशिल नाल्यात जात असल्याने ग्रामस्थ नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारीत वाढ झाली आहे. ग्रामस्थांच्यावतीने अनेकदा हिरानंदानी व्यवस्थापनाला सांगून अर्ज देऊनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांत नाराजीचा सुर उमटला आहे. येथील आदिवासी समाज व ग्रामस्थ या पाण्यात अंघोळ करत असताना त्यांच्या अंगावर पुरळ उठणे, अंगाला खाज येणे असे असे त्वचेचे आजार होत आहेत. शिवाय नाल्यालगतची शेती, भाजीपाळ्याचे मळे यासाठी पाण्याचा वापर केल्यास भाजीपाल्यावर रोग येत असल्याचे बोलले जात आहे. तसेच, मुक्या जनावरांना देखील हे पाणी पिण्यास योग्य नसल्याने मुक्या जनावरांसह नागरिकाच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यासाठी पानशिल ग्रामस्थांनी वासांबे मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायत, खालापूर तहसिलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य खाते यांना लेखी पत्रव्यवहार करून हिरानंदानी रेसिडेन्सी विरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.