शेकापचे शेखर पाटील यांचे निवेदन
। उरण । वार्ताहर ।
उरण नगरपालिका हद्दीतील आनंद नगर परिसरात गेल्या महिनाभरापासून नगरपालिकेकडून अपुरा पाणीपुरवठा होत आहे. दोन ते तीन दिवस पालिकेकडून पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाहीत. यासंदर्भात नागरिकांनी पालिकेकडे लेखी व भेटी देऊन तक्रारी दिल्या आहेत. तरीसुद्धा सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. या संदर्भात नगरपालिकेकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याने, शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस शेखर पाटील यांनी शिष्टमंडळा समवेत नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांना निवेदन दिले आहे.
नगरपालिकेने या अगोदरच मंगळवार आणि शुक्रवार पाणीपुरवठा बंद केला असताना नागरिकांना उर्वरित दिवसात पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यातच नगरपालिकेची कोट्यावधींची थकबाकी एमआयडीसीकडे असल्यामुळे एमआयडीसी नगरपालिकेला पाणीपुरवठा करत नसल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भात नागरिकांनी एमआयडीसीची असलेली थकबाकी नगरपालिकेने भरावी व नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर रांनसाई धरणाबरोबर हेटवणे धरणाचे पाणी नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर नागरिकांच्या पाण्याचा मूलभूत प्रश्न सुटला नाही तर आम्हाला धरणे आंदोलन व मोर्चा या मार्गाचा अवलंब करावा लागेल. त्यामुळे नगरपालिकेने लवकरात लवकर उरण शहराला सुरळीत पाणीपुरवठा करावा, असे आवाहन शेकापचे शहर चिटणीस शेखर पाटील यांनी केले आहे. यावेळी शिष्टमंडळासमवेत प्रभाकर तांडेल, बेचैन परदेशी, रोहन म्हात्रे, शरद ठाकुर, घनश्याम कडू व रवी म्हात्रे आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी समीर जाधव यांनी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असून लवकरात लवकर पाणी सुरळीत होण्यासाठी अधिकार्यांना सूचना केल्या असल्याचे सांगितले आहे. यावेळी पाणी विभागाच्या प्रमुख वंजारी व संतोष कांबळे देखील उपस्थित होते.