बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा
| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
खांदा कॉलनी येथील ऐतिहासिक खांदेश्वर शंकर मंदिर परिसरातील विविध नागरी समस्या तात्काळ सोडवाव्यात, अन्यथा दि.13 जुलै पासून मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल, असा इशारा परिवर्तन सामाजिक संस्था महाराष्ट्रच्यावतीने पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त यांना देण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात मंदिर परिसरातील तलावात अनेक वर्षांपासून साचलेला गाळ काढून तलाव स्वच्छ करणे, भग्नावस्थेतील कंपाउंड वॉलची दुरुस्ती करणे, उद्यानातील तुटलेले व खराब पत्रे बदलणे, वाढलेले गवत व झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे, तसेच बंद असलेले सार्वजनिक शौचालय तात्काळ सुरू करणे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच, मंदिरासमोर उभे असलेले फिरते शौचालय आणि मलनिस्सारणाच्या गाड्या हटवून परिसर स्वच्छ व सुस्थितीत ठेवावा. मुंबई-पुणे जुन्या महामार्गाकडील मंदिराच्या प्रवेशद्वाराचे पुनर्बांधकाम करून भाविकांच्या सुरक्षिततेची योग्य व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. संस्थेच्या म्हणण्यानुसार, रायगड जिल्ह्यातील प्राचीन व जागृत देवस्थान म्हणून ओळख असलेल्या खांदेश्वर मंदिरात दररोज मोठ्या संख्येने भाविक येत असतात. मात्र, परिसरातील दुर्लक्ष, अस्वच्छता आणि अपुऱ्या नागरी सुविधांमुळे भाविक व स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पनवेल महानगरपालिकेने या सर्व मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन कामे सुरू करावीत, अन्यथा दि.13 जुलैपासून मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल, असा इशारा परिवर्तन सामाजिक संस्था महाराष्ट्रचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी दिला आहे.






