। वावोशी । वार्ताहर ।
खोपोलीतील टाटा पॉवर प्रकल्पात कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक गणेश गवळे हे सकाळच्या सुमारास डिस्पेंसरी गेट सुरक्षा पोस्ट येथे कर्तव्यावर असताना, त्यांना सोन्याची अंगठी पडलेली दिसली. गणेश गवळे यांनी तात्काळ सजगता दाखवत ही माहिती मुख्य गेटवरील सुरक्षा अधिकारी व कर्मचारी सतीश मोहिते यांना दिली. त्यानंतर सतीश मोहिते यांनी कॉलनी ग्रुपवर ही माहिती पोस्ट केली. काही वेळोत स्पष्ट झाले की, ही अंगठी अमोल केदारी यांच्या मुलीची आहे. यावेळी आवश्यक ओळखपत्रांची खात्री करून अंगठी त्यांच्याकडे सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आली. गणेश गवळे यांनी दाखवलेली जबाबदारी आणि प्रामाणिकता ही टाटा समूहाच्या मूल्यांची जपणूक करणारी आहे. त्यांच्या या कार्याचे खोपोली टीमकडून विशेष कौतुक करण्यात आले.