। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील झिराड ग्रामपंचायत, साई क्रीडा मंडळ, महिला मंडळ, रायगड जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने हा स्तुत्य उपक्रम घेण्यात आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती भोईर यांनी पुढाकार घेत दहावीच्या परीक्षेत उतीर्ण झालेल्या झिराड ग्रामपंचायत हद्दीतील गावे, वाड्यांमधील 17 गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे औचित्य साधत झिराड शाळेतील शिक्षिका वृंदा घरत यांचादेखील सेवानिवृत्त झाल्याबद्दल मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी झिराडच्या सरपंच दर्शना भोईर, उपसरपंच सुजाता माने, किर्ती माने, संध्या गावडे, रोहीणी पेटारे, अलका ठाकूर, उल्हास भोईर, सुभाष झिराडकर, संदिप भिसे तसेच महेश माने, राहूल भोईर, रवि म्हात्रे, अशोक थळे, विरेश खेडेकर, ग्रामसेवक संजय पाटील, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षक ठाकूर यांनी केले.