सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद
| पनवेल | प्रतिनिधी |
कामोठे परिसरातील न्यू वेलकम फॅमिली रेस्टॉरंट या हॉटेलमध्ये चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रात्रीच्या सुमारास दोन अनोळखी चोरट्यांनी हॉटेलचे शटर वाकवून आत प्रवेश केला आणि मुख्य काऊंटरमधील गल्ला फोडून रोख 16,500 रुपये चोरून नेले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हर्षल देवानंद पाटील (23), हे या हॉटेलचे मालक असून, त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या किचन सुपरवायझरने फोन करून हॉटेलचे शटर वाकलेले आणि गल्ला उघडलेला असल्याची माहिती दिली. त्यानंतर मालक पाटील व मॅनेजर मिलिंद पाटील हॉटेलवर पोहोचले असता, गल्ल्यातील 16,500 रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. यात 10, 20, 50, 100, 200, 500 अशा विविध किमतीच्या नोटा व 450 रुपये चिल्लर रक्कम असल्याचे सांगण्यात आले. हॉटेलमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन चोरटे स्पष्टपणे दिसून येत आहेत. त्यापैकी एकाने डोक्यावर रूमाल व तोंडावर मास्क बांधला होता. हे चोरटे स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने गल्ला फोडताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. कामोठे पोलीस ठाण्याने घटनेची नोंद घेतली असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे. परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी सुरू असून लवकरच आरोपींचा माग काढला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.