विमानतळाला दिबांचे नाव द्या, अन्यथा खुर्ची खाली करा
विराट आंदोलनाचा इशारा
| पनवेल | प्रतिनिधी |
राज्यात मुसळधार पावसाचा कहर सुरू असतानाही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी दिबाप्रेमी बुधवार दि.8 जुलै रोजी विधानभवनावर विराट मोर्चा काढणार आहेत. पाऊस, पूर किंवा प्रशासनाचा अडथळा यांची पर्वा न करता हजारो कार्यकर्ते मुंबईकडे कूच करणार असून, सरकारविरोधात जोरदार एल्गार पुकारला जाणार आहे.
लोकनेते दिबाप्रेमी नामकरण समितीने या आंदोलनाची हाक दिली असून, “नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव द्या, अन्यथा खुर्ची खाली करा,” असा थेट इशारा सरकारला देण्यात आला आहे. पावसामुळे आंदोलन होणार नाही, असा समज करून घेणाऱ्यांना आगरी समाज आपल्या एकजुटीची ताकद दाखवेल, असा निर्धार समितीने व्यक्त केला आहे.
मोर्चापूर्वी सकाळी 10 वाजता पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कार्यकर्ते एकत्र येणार असून, शिवरायांना अभिवादन करून दिबांच्या नावासाठी लढण्याची शपथ घेणार आहेत. त्यानंतर विधानभवनाच्या दिशेने मोर्चा काढण्यात येणार आहे.
या आंदोलनात उपोषणकर्त्या रश्मिता पोपेटा सहभागी होणार असून, त्यांच्यासह दिबाप्रेमी, विविध संघटना, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. माजी आमदार बाळाराम पाटील, कांतीलाल कडू, मनोहर भोईर, उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर, सर्वेश तरे, सत्यवान म्हात्रे आदींनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.







