कार्यकाळ संपल्यानंतर पंतप्रधानांचे हेलिपॅडवर स्वागत करणार्या नगरसेवकांच्या ओळखपत्रावर नगरसेवक असा उल्लेख
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
खारघर येथील इस्कॉन मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी (दि. 15) खारघर येथे आले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांचे हॅलिकॉप्टर उतरण्यासाठी तयार करण्यात आलेल्या हॅलिपॅडवर त्यांच्या स्वागतासाठी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या ठिकाणी उपस्थित असलेल्या भाजपच्या पनवेल पालिकेतील कार्यकाळ संपलेल्या नगरसेवकांच्या ओळखपत्रावर नगरसेवक असा उल्लेख करण्यात आला असल्याने सध्या नव्या वादाला तोंड फुटले आहे.
देशाच्या पंतप्रधानांच्या स्वागताला आणि निरोप सभारंभाला उपस्थित राहणारे नगरसेवक आजी आहेत की माजी याची साधी खातरजमा करण्याची तसदी स्टेट इंटीलिजेन्स डिपार्मेंट महाराष्ट्रकडून घेण्यात आलेली नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही चूक होऊ नये याकरिता प्रधानमंत्र्यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहणार्या व्यक्तींच्या पार्शवभूमीची तपासणी केंद्रीय गुप्तचर विभागाकडून करण्यात येत असते. याकरिता उपस्थित राहणार्या व्यक्तीच्या कागदपत्रांची तपासणी केली जाते. बुधवारी खारघर येथील इस्कॉन मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी उपस्थित होते.पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भाजपचे पनवेल पालिकेतील कार्यकाळ संपलेले नगरसेवक विद्यमान नगरसेवक असा उल्लेख असलेले ओळखपत्र गळ्यात अडकवून उपस्थित होते.
माजी नाही प्रभारी
नगरसेवक म्हणून उपस्थित असलेल्या माजी नगरसेवकांबाबत विचारणा केली असता नगरसेवकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूक झालेली नसल्याने कार्यकाळ संपलेले नगरसेवक माजी नसून, प्रभारी असल्याने त्यांना नगरसेवक म्हणून ओळखपत्र देण्यात आले असल्याची माहिती एसआईडीच्या अधिकर्याकडून नाव न सांगण्याच्या अटीवर देण्यात आली.