आमचे गुरचरण दिल्यास आंदोलन करु

मुद्रेवासियांचा प्रशासनाला इशारा

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत अग्निशामक केंद्र आणि श्री मुद्रेश्‍वर मंदिरासमोरील गुरचरणाची जमीन कुणालाही देऊ नका. आम्हा मुद्रेवासियांना सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठी तितकीच जागा शिल्लक आहे. तिचा वापर आम्हालाच करू द्या. तरीही ही जमीन अन्य कुणालाही देण्याचा प्रयत्न केल्यास ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

मुद्रे परिसरातील ग्रामस्थांचे शिष्टमंडळ रायगड जिल्हाधिकार्‍यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले होते. या शिष्टमंडळात वसंत मोधळे, अनिल मोरे, सोमनाथ पालकर, किशोर कदम, सागर तवळे आणि जयदीप शिंदे यांचा समावेश होता. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे पूर्वनियोजित सभेमध्ये व्यस्त असल्याने शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील मौजे मुद्रे बुद्रुक, ता. कर्जत, जि. रायगड येथील गुरचरण सर्वे नंबर 16/0, अग्नीशामक दल व श्री मुद्रेश्‍वर मंदिरासमोरील जागा गावचे गुरचरण आहे. या जागेचे एकूण क्षेत्रफळ 01-57-0 हे. आर. असून, यामध्ये शासकीय विश्रामधाम, नगरपरिषद गार्डन, अग्निशमक दलाची इमारत तसेच बायोगॅस प्रकल्प व कर्जत मुरबाड राज्यमार्ग यासाठी आरक्षित आहे. एकूण क्षेत्रापैकी राज्यमार्गलगत सुमारे 0-16-0 गुंठे ही जागा शिल्लक आहे. तसेच यापूर्वी मुद्रे खुर्द येथील सर्वे नंबर 14 क्षेत्र 1-00-0 हे. आर. असलेली गुरचरणाची जागा लिंगायत वाणी व दाऊदा बोहरी समाज यांना दफनभूमीसाठी दिलेली आहे. तसेच नुकताच रेल्वे प्रकल्प राबविण्यासाठी मुद्रे ग्रामस्थांच्या मालकी हक्काच्या जमिनीसुद्धा भूसंपादन केलेल्या आहेत. त्यामुळे आमच्या ग्रामस्थांसाठी सार्वजनिक, धार्मिक कामासाठी कोणत्याही प्रकारची जागा उपलब्ध नाही.

गुरचरण जागेवर ग्रामस्थांचा हक्क असताना आमच्यावर मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेला आहे. तसेच आमच्या गावातील ग्रामस्थांच्या सुमारे 17 एकर खासगी जमिनीसुद्धा कोकण प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राने संपादित केलेल्या आहेत. त्यामुळे मुद्रे (बुद्रुक), मुद्रे (खुर्द), नाना मास्तर नगर येथील नागरिकांना भविष्यात सांस्कृतिक कार्यक्रम व धार्मिक उत्सव करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. मौजे मुद्रे बुद्रुक, ता. कर्जत, जि. रायगड येथील गुरचरण सर्वे नंबर 16 / 0, मधील फक्त 0 – 16 – 0 गुंठे जागा राज्य महामार्गला शिल्लक राहिलेली आहे. त्यासमोर श्री मुद्रेश्‍वर शिवमंदिर असून या मंदिरात शिवरात्र, गणेश जन्म, गोकुळाष्टमी, भागवत सप्ताह, व तुकाराम बीज असे अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात. त्यासाठी समोरील जागेचा वापर धार्मिक कार्यासाठी ग्रामस्थ करीत आहेत. त्यामुळे सदरची जागा राखीव ठेवणे आवश्यक आहे.

ही जागा आमच्या ग्रामस्थांसाठी कायमस्वरूपी राखीव ठेवावी व तिथे आम्हा ग्रामस्थांना क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम व धार्मिक विधीकरिता जागा राखीव ठेवावी व सदर जागा कोणलाही हस्तांतरित करण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध असेल. भविष्यात तेथे सर्वांसाठी सामाजिक सभागृह उभारल्यास त्याचा परिसरातील नागरिकांना उपयोग होईल. त्याकरिता सदर जागा ग्रामस्थांना राखीव ठेवण्यात यावी, अशी विनंती करण्यात येत आहे. तरीसुद्धा ही जागा कुणालाही हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केल्यास ग्रामस्थ उग्र आंदोलन करतील. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Exit mobile version