ट्रकसह 15 लाखांचा मुद्देमाल जप्त
| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |
साळाव चेक पोस्टवर सोमवारी (दि.21) पहाटे 3.15 वाजण्याच्या सुमारास एक मोठी कारवाई करण्यात आली. बेकायदेशीरपणे समुद्रातून वाळू उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पर्दाफाश करण्यात आला असून, सुमारे 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकमधून सुमारे 6 ब्रास समुद्र वाळूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. हा ट्रक रेवदंडा पुलावरून साळाव चेक पोस्टकडे येत असताना त्याला थांबविण्यात आले. याप्रकरणी मनोजकुमार तानाजी पाटील (29), रा. कनगल, ता. हुक्केरी, जि. बेळगाव, कर्नाटक राज्य याच्याविरुद्ध रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईची तक्रार बोर्लीचे तलाठी हेमंत चांदोलकर यांनी नोंदवली असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंगेश बाचकर व पोलीस हवालदार पाटील हे पुढील तपास करीत आहेत.







