। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुचविलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी, प्रशासनाने गाव पातळीवर राबविलेल्या विविध उपाययोजना यामुळे जिल्ह्यातील गावे टप्प्याटप्प्याने कोरोनामुक्त होत आहेत. जिल्ह्यातील 1 हजार 912 महसूली गावांपैकी 251 गावे कोरोनामुक्त झाली असून, या गावांमध्ये सद्यस्थितीत एकही कोरोना रुग्ण नाही.
जिल्ह्यासाठी ही आशादायक बाब आहे.रायगड जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत आहेत.. सुरुवातीला पनवेल महानगर पालिका हद्दीत कोरोना रुग्ण आढळले. मात्र त्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडू लागले. ग्रामीण भागातील कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने प्रयत्नांची कंबर कसली आहे. सरकारने लागू केलेले निर्बंध तसेच उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तसेच विविध उपाययोजना राबविण्यात आलेल्या आहेत.
प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजनांना ग्रामीण भागातील नागरिकांची साथ मिळत असून, जिल्ह्यातील गावे टप्प्याटप्प्याने कोरोना मुक्त होत असल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील 810 ग्रामपंचायतींमध्ये 1 हजार 912 महसूली गावे असून, यामधील 162 ग्रामपंचायतींमधील 251 गावे कोरोनामुक्त झाली आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टसिंगचे पालन करावे, वेळोवेळी सॅनिटायजरचा वापर करावा, गरम पाण्याचा वाफारा घ्यावा, गुळण्या कराव्यात, पात्र नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, कोरोनाची लक्षणे असल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी, असे आवाहन डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
अलिबाग तालुक्यातील 222, पेण तालुक्यातील 156, उरण तालुक्यातील 63, गावांपैकी एकही कोरोनामुक्त गाव नसून पनवेलमधील 147 गावांपैकी 10 कोरोनामुक्त, कर्जत 178 पैकी 5, खालापूर 136 पैकी 40, सुधागड 100 पैकी 29, रोहा 73 पैकी 22, मुरुड 170 पैकी 7, म्हसळा 182 पैकी 9श्रीवर्धन 58 पैकी 13, माणगांव 80 पैकी 49, तळा 78 पैकी 11, महाड 183 पैकी 29, पोलादपूर 86 पैकी 17 अशा एकूण 1912 गावांपैकी 251 गावे कोरोनामुक्त झाली आहेत.
रुग्ण सापडण्याच्या सरासरी प्रमाणात घट
रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रादुर्भाव रुग्ण सापडण्याचे सरासरी प्रमाण कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र दिसून येते. 15 मे रोजी जिल्ह्यात कोरोना चाचणी केलेल्या नगरिकांपैकी 19.5 टक्के नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होत होते. यामध्ये अत्ता घट झाली असून, सध्या तपासणी केलेल्या नागरिकांपैकी 13 टक्के नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होत आहे…
ग्रामीण भागात राबविलेल्या उपाययोजना
ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुचविलेल्या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांवर अँटीजन चाचणी करण्यात येत आहे. गावोगावी आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून कोरोना लक्षणे आढळणार्यांची अँटीजन चाचणी करण्यात येत आहे. विनाकारण घराबाहेर फिरणार्या नागरिकांची बाजारपेठ तसेच इतर ठिकाणी अँटीजन चाचणी करण्यात येते. या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळणार्या रुग्णांवर औषोधपाचार करण्यात येतात. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांच्या अखत्यारीत असलेल्या उपकेंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.