। नागोठणे । वार्ताहर ।
रोहा येथील कनिष्ठ स्तर दिवाणी व फौजदारी न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या दिवाणी व फौजदारी अशा 296 प्रलंबित खटल्यांपैकी 10 खटले तडजोडीने निकालात काढण्यात आली. यामधून 1 लाख 86 हजार, 649 एवढी रक्कम फिर्यादींना प्राप्त झाली. तसेच या लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या दाखलपूर्व वाद खटले म्हणजेच रोहा नगरपरिषद, तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी, राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था, बीएसएनएल, एमएसईबी यांच्याकडील एकत्रित 4,616 प्रकरणे तडजोडीकरिता लोकन्यायालयात ठेवून ती तडजोडीने मिटविण्याचे आवाहन पक्षकारांना करण्यात आले होते. त्यास पक्षकारांनी चांगला प्रतिसाद दिल्याने 814 प्रकरणे तडजोडीने निकाली काढून त्यामधून 74 लाख, 50 हजार, 905 रक्कमेची वसुली झाली.
रोह्यातील या लोकन्यायालयात कक्षप्रमुख म्हणून तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश एस.डी. कमलाकर यांनी तर पंच म्हणून विधीज्ञ अॅड. दिनेश वर्मा व अॅड. एस.ए. हाफिज यांनी काम पाहिले. यावेळी रोहा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी फडतरे, रोहा वकील संघाचे ज्येष्ठ विधीज्ञ अॅड.एस.एन. सानप, अॅड.आर.बी. सावंत, अॅड.एम.एन.शिंदे, रोहा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्था, बीएसएनएल, एमएसईबीचे प्रतिनिधी आदींसह पक्षकार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही लोकअदालत यशस्वी होण्यासाठी रोहा न्यायालयातील सर्व कर्मचार्यांनी सहकार्य केले.