शेकाप नेते पंडित पाटील यांचा घणाघात
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
थळमधील लोकप्रतिनिधी असताना देखील आजही इथले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. साधे पाणी देऊ शकले नाही. त्यामुळे खोटया आश्वासनांना भुलून ज्या मतदारांनी मोठया अपेक्षेने मतदान केले त्यांचा भ्रमनिराश झाला त्यामुळे अडीच वर्षात थळसह अलिबाग तालुका विकासापासून मागे गेला असल्याची घणाघाती टिका शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी केली.
शेतकरी कामगार पक्षाच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त थळ विभागाची आढावा बैठक आज सोमवारी को.ए.सो.रानडे हायस्कूल थळ येथे शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते शंकरराव म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या सभेस तालुका चिटणीस अनिल पाटील, द्वारकानाथ नाईक, शैला पाटील, थळ जिल्हा परिषद मतदार संघ अध्यक्ष सुरेश घरत, शाळा सभापती श्रीरंग घरत, सतिश म्हात्रे, शिरीष राजके, तुकाराम लडगे, पुरोगामी युवक संघटना अध्यक्ष विक्रांत वार्डे, तसेच थळ मतदार संघातील सरपंच, उपसरपंच,सदस्य, पदाधिकारी व शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
पंडित पाटील पुढे म्हणाले की, वर्धापन दिनाच्या निमित्ताने पक्षाच्या सातत्याने होत असलेल्या संपर्क बैठकांमुळे तालुक्यामध्ये शेकापक्षाने आघाडी घेतलेली आहे. शेकापक्षाचे नेते शेवटच्या थरापर्यंत पोहचत असल्याने लोकांची देखील खात्री झाली आहे. त्यामुळे 2 तारखेला जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्ते सहभागी राहतील असा विश्वास पंडित पाटील यांनी व्यक्त केला. यापुढे देखील सर्व भागात दर दोन महिन्याने संपर्क ठेवणार असल्याचे ते म्हणाले. शेकापक्षाच्या बैठकीमुळे थळ मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले. थळ नवगाव हा शेकापक्षाचा बालेकिल्ला होता प्रतिनिधीत्व दिले त्यांनीच गद्दारी केली. पोकळी निर्माण झाली होती. मतदारांना वस्तूस्थिती लक्षात आली. पंडित पाटील यांचा पराभव कसा झाला. पराभव करण्यासाठी सर्व पक्षांना एकत्र यावे लागले हिच पक्षाची खरी ताकद आहे. काँग्र्रेसच्या मतांचे विभाजन झाले. थळ मतदारसंघात पुन्हा एकदा शेकापक्ष नव्या जोमाने उभा राहील असा विश्वास पंडित पाटील यांनी व्यक्त केला.
शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी मार्गदर्शन करताना शेकापक्षाची ताकद दाखवून वर्धापन दिनाला कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. थळमधील ग्रामस्थांनी दहशतीला न घाबरता पुढे यावे आपण सर्वांच्या सोबत ठाम राहू. या भागातील प्रश्न सोडविण्यासाठी शेकाप कटिबध्द असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
चित्रलेखा पाटील यांच्या कामाचे कौतुक
शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी कोरोना काळात मोठे उल्लेखनीय काम केले. अनेकांना आधार दिला मोठया प्रमाणावर मदत केली. तहानलेल्या थळच्या ग्रामस्थांसाठी स्वखर्चाने पाणी पुरवठा केला. मात्र मतदारांनी ज्यांना मोठया विश्वासाने निवडून दिले ते घरी बसले असेही यावेळी पंडित पाटील यांनी सांगून चित्रलेखा पाटील यांच्या कामाचो कौतुक केले.







