झाडांना लोखंडी खिळ्यांचे ठोकण्याचे प्रकारात वाढ

। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात फार्म हाऊसेसचे जाळे उभे राहत असून त्या फार्म हाऊसेस बांधणार्‍या कंपन्यांकडून निसर्ग वाचविण्याचे सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत. आपल्या फार्म हाऊस सोसायटीकडे जाणारे रस्ते लगेच ओळखू यावेत यासाठी या फार्म हाऊस बांधणार्‍या बिल्डरकडून आता रस्ते दर्शक म्हणून झाडांचा वापर केला जात आहे. दरम्यान, रस्ते मार्ग दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांना लोखंडी खिळे ठोकून मार्ग दाखवले जाण्याचे प्रकार वाढले असून, पर्यावरणप्रेमी तरुण या प्रकाराने नाराज झाले आहेत. कर्जत तालुक्यातील कोणत्याही परिसरात गेले तरी फार्म हाऊसेस सोसायटी यांची बांधकामे सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र विकास होत असताना सोबत चांगल्या गोष्टींचा र्‍हास देखील सोबत घेऊन येत असतो. त्यात या फार्म हाऊसेसची माहिती व्हावी रस्ताही ग्रामीण भागातील रस्ते हे नामफलकांनी व्यापले आहेत. मात्र त्याच फार्म हाउसेसचे डेस्टिनेशन शोधणे सोपे व्हावे यासाठी आता चक्क झाडांवर खिळे ठोकून बोर्ड लावण्याची नवीन प्रथा पडली आहे. ग्रामीण भागातील बहुतेक सर्व रस्त्यांवर रस्त्याच्या कडेला असलेली झाडे ही फार्म हाऊसेस सोसायटी यांचे बोर्ड लावण्यासाठी आंदण ठेवली आहेत काय? असा प्रश्‍न निर्माण होत आहे. झाडांना खिळे ठोकून पत्र्याचे बोर्ड अडकवले जात आहेत. ते बोर्ड अडकवताना जिवंत झाडांना लोखंडी खिळे ठोकण्याचे सुरु असलेले प्रकार थांबवण्याची गरज पर्यावरण प्रेमी तरुण यांच्याकडून व्यक्त होत आहे.

पर्यावरणप्रेमी उदय पाटील यांनी असे प्रकार कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांवर अधिक प्रमाणांत दिसून येत असल्याची तक्रार केली आहे. रस्त्याच्या बाजूला असलेली 100 वर्षे जुनी झाडे मारण्याचे प्रकार सुरु असून आता त्या झाडांना खिळखिळे करण्याचे प्रकार लोखंडी खिळे ठोकून केले जात आहे. त्या खिळ्यांमुळे झाडांचे आयुष्य कमी होत असून आपली फार्म हाऊसेस सोसायटीकडे जाणारे रस्ते ठळकपणे दिसावेत यासाठी त्यांच्याकडून झाडांचा सुरु असलेला वापर धोकादायक असून तालुक्यातील झाडे नष्ट करण्याचा हा प्रकार असून फार्म हाऊसेस बांधणार्‍या बिल्डर लॉबीने रस्त्याच्या कडेला लोखंडी बोर्ड लावून बॅनर लावावेत, अशी सूचना उदय पाटील यांनी केली आहे. आता वन विभाग अशा फार्म हाऊसेस कंपन्यांवर कोणती कारवाई करतात याकडे पर्यावरण प्रेमी यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Exit mobile version