भारत-पाकिस्तान सामना 1 मार्चला होणार?

। इस्लामाबाद । वृत्तसंस्था ।

भारत विरूद्ध पाकिस्तानचा सामना हा क्रिकेट विश्‍वातील एक हायव्होल्टेज सामना असतो. आयसीसी टूर्नामेंटमध्ये एकदा वगळता टीम इंडियाने प्रत्येक वेळी पाकिस्तानला नमवले आहे. अलीकडेच, टी-20 विश्‍वचषक 2024 मध्ये झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 6 धावांनी पराभव केला. दरम्यान, या दोन्ही संघांमध्ये पुन्हा एकदा ही मोठी लढत पाहायला मिळणार आहे. पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये होणार्‍या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील सामन्याबाबत पीसीबीने वेळापत्रक तयार केले असून भारत पाकिस्तान सामन्याची तारीखही निश्‍चित केली आहे.

पीसीबीच्या म्हणण्यानुसार, ही स्पर्धा 19 फेब्रुवारी ते 9 मार्च या कालावधीत होणार आहे. 10 मार्च हा राखीव दिवस आहे. म्हणजेच अंतिम फेरीसाठी आणखी एक दिवस ठेवण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नक्वी यांना टी-20 विश्‍वचषक फायनलसाठी बार्बाडोसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, त्यांनी 15 सामन्यांचे वेळापत्रक आयसीसी समोर सादर केले आहे.

भारत-पाकिस्तान एकाच गटात
भारताचे उपांत्य फेरीसह सर्व सामने लाहोरमध्ये होणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दोन गट करण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तानला अ गटात ठेवण्यात आले आहे. या दोन संघांशिवाय बांगलादेश आणि न्यूझीलंड हे संघही आहेत. ब गटात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे. अलीकडेच, आयसीसीचे इव्हेंट प्रमुख ख्रिस टेटली यांनी इस्लामाबादमध्ये चेअरमन मोहसिन नक्वी यांची भेट घेतली.
पाकिस्तानमध्ये होणार चॅम्पियन्स ट्रॉफी
पाकिस्तान क्रिकेट बोर्डने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या वेळापत्रकाचा मसुदा तयार केला आहे आणि तो आयसीसीला सादर केला आहे. यावेळी पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद मिळाले आहे. पीसीबीने या वेळापत्रकात 1 मार्च 2025 रोजी लाहोरमध्ये कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्धचा चॅम्पियन्स ट्रॉफी सामना निश्‍चित केला आहे. मात्र, त्यात सहभागी होण्यासाठी आणि टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवण्यास बीसीसीआयने अद्याप संमती दिलेली नाही.
Exit mobile version