कटकच्या मैदानावर धावांचा पाऊस; सामना जिंकत 2-0ची आघाडी
। कटक । वृत्तसंस्था ।
कटकमधील बाराबती मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसर्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 304 धावांचा मोठा स्कोर केला. तर, प्रत्युत्तरात भारतीय संघाने इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग दुसरा सामना जिंकत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. दरम्यान, कर्णधार रोहित शर्माच्या स्फोटक शतकी खेळी आणि उपकर्णधार शुबमन गिलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने हा सामना जिंकला आहे.
इंग्लंडने दिलेल्या 305 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी भारतासाठी सलामी दिली. दरम्यान, दोन्ही खेळाडूंनी आक्रमक सुरूवात केली. शुबमन गिलने शानदार अर्धशतक झळकावले. मात्र, तो 60 धावांवर तंबूत परतला. त्यानंतर तिसर्या क्रमांकावर दिग्गज फलंदाज विराट कोहली फलंदाजीसाठी आला. सर्वांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, कोहलीने पुन्हा निराश केले. कोहलीला अवघ्या 5 धावा करून बाद झाला. मात्र, कर्णधार रोहित शर्माने शानदार पुनरागमन करत आपल्या चाहत्यांना खूश केले. त्याने आक्रमक अंदाजात पहिले अर्धशतक त्यानंतर शतक झळकावत टीकाकारांची बोलती बंद केली आहे.
आता दोन्ही संघात मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना बुधवारी (दि.12) खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. रोहित शर्मा 90 चेंडू, 12 चौकार, 7 षटकार, 119 धावा.
रोहितचे शानदार पुनरागमन
गेल्या काही महिन्यांपासून रोहित शर्मा खराब फॉर्ममधून जात होता. इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहितची बॅट शांत राहिली. तो केवळ 6 धावा करून तंबूत परतला होता. मात्र, कटकच्या मैदानावर रोहितने शतक ठोकत शानदार पुनरागमन केले आहे. त्याने यापूर्वी मार्च 2024 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले होते. कटक मधील सामन्यात तब्बल 11 महिन्यांनी त्याने 76 चेंडूत शतक झळकावले आहे. तत्पुर्वी त्याने 30 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रोहित शर्माचे हे 49 वे शतक असून शतकांच्या बाबतीत त्याने माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविडला मागे टाकत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज डेव्हिड वॉर्नरची बरोबरी केली आहे. तसेच, या सामन्यात त्याला ’प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कारही मिळाला आहे.
ख्रिस गेलला टाकले मागे
रोहित शर्मा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत दुसर्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने ख्रिस गेलला मागे टाकले आहे. रोहित आता 267 एकदिवसीय सामन्यांमधील 259 व्या डावात 335 षटकार मारण्याची कामगिरी केली आहे. ख्रिस गेलने त्याच्या कारकिर्दीत 301 एकदिवसीय सामन्यांच्या 294 डावांमध्ये 331 षटकार मारले होते.आता एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित शर्मा आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीच्या (351) मागे आहे.