पर्यटकांना गड, किल्ले, युद्धभूमी पाहण्याची संधी
। रायगड । प्रतिनिधी ।
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जवळून अनुभवण्याची नामी संधी पर्यटक आणि शिवप्रेमींना लाभणार आहे. हिंदवी स्वराज्याचे ऐतिहासिक साक्षीदार असणार्या गड, किल्ल्यांवर जाणे आता आणखी सोयीचे होणार आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ विशेष भारत गौरव सर्किट यात्रेची घोषणा केली आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या भारत गौरव सर्किट यात्रेतून पर्यटकांना गड, किल्ले, युद्धभूमीचे दर्शन घडणार आहे.
केंद्र सरकारच्या देखो अपना देश आणि एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाच्या अनुषंगाने देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत गौरव टूरिस्ट ट्रेन चालविण्यात येणार आहे. यासाठी विशेष पर्यटन ट्रेन पॅकेज सुरू करण्यात आले आहे. भारतीय रेल्वे, इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटीसी) पर्यटन ट्रेन चालविण्यात येतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी आणि काळातील महत्त्वाची ऐतिहासिक स्थळे परस्परांना जोडण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. भारत गौरव सर्किट यात्रेद्वारे ही ठिकाणे एकमेकांशी जोडली जाणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची उभारणी केली. महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित किल्ले, राजवाडे, युद्धभूमी अशी अनेक महत्त्वाची ऐतिहासिक स्थळे आहेत. विशेष भारत गौरव सर्किट यात्रेमुळे प्रवाशांना विशेषतः तरुणांना इतिहासाशी जोडण्याची आणि समृद्ध मराठा इतिहासाचा भाग असलेल्या या ठिकाणांना भेट देण्याची आणि जवळून बघण्याची संधी मिळेल, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आयआरसीटीसीने याआधी भारत गौरव सर्किट यात्रेद्वारे पर्यटकांना देशातील विविध ठिकाणांचे दर्शन घडवले आहे. पर्यटकांसाठी विशेष टूर ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. आयआरसीटीसी टूर दरम्यान पर्यटकांना सुरक्षित आणि निरोगी प्रवास घडवून आवश्यक खबरदारीचे उपाय करण्यात येणार आहेत. तसेच धर्मशाळा किंवा हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, सकाळचा चहा, नाश्ता, दुपारचे जेवण, चहा, कॉफी आणि रात्रीचे जेवण याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पर्यटकांना पर्यटनस्थळी जाण्यासाठी वाहनांची व्यवस्थाही करण्यात येते. आयआरसीटीसीने आकर्षक किंमतीत सर्व समावेशक पॅकेजेस उपलब्ध असतात. तसेच पर्यटकांना आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.