बंद डंपिंग ग्राऊंडवर पुन्हा घाणीचे साम्राज्य
| उरण | प्रतिनिधी |
उरण नगरपरिषद हद्दीतील हरिश्चंद्र गावंड उद्यानामागील न्यायालयाच्या आदेशाने कायमस्वरूपी बंद करण्यात आलेल्या डंपिंग ग्राऊंडवर पुन्हा बेकायदेशीर कचरा टाकला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नगरसेविका प्रमिला संतोष पवार यांनी मुख्याधिकारी, उरण नगरपरिषद यांच्याकडे लेखी तक्रार करून हा प्रकार निदर्शनास आणून दिला आहे. संबंधित जागा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार व प्रदूषण नियंत्रण कायद्याच्या उल्लंघनामुळे बंद करण्यात आलेली असताना, काही अज्ञात व्यक्तींमार्फत पुन्हा कचरा टाकला जात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
विशेष म्हणजे, नेवल अर्मामेंट डेपो येथून कचरा भरलेल्या गाड्यांद्वारे हा कचरा आणून टाकला जात असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार केवळ पर्यावरणासाठी घातक नसून, न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणारा असल्याची टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेविका प्रमिला पवार यांनी प्रशासनाकडे तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून बेकायदेशीर डंपिंग थांबवण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधितांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा आणि नेवल अर्मामेंटकडून कचरा येत असल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच प्रशासनाने केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल देण्याची मागणीही करण्यात आली आहे. या पत्राच्या प्रती नगराध्यक्ष व उरण पोलीस ठाण्यास देण्यात आल्या असून, आता प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस कारवाई करते का, याकडे उरणकरांचे लक्ष लागले आहे.
