आरसीएफच्या वसाहतीमधून दोघे जेरबंद; स्थानिकांना गेट बंद; चोरट्यांचा मात्र खुला वावर?
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
नाशिकमध्ये घरफोडी करून अलिबागमध्ये नातेवाईकांकडे लपून बसलेल्या दोघांना अखेर पोलिसांनी जेरबंद केले. अलिबाग आणि नाशिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत नाशिकच्या घरफोडीच्या सूत्रधारांना अलिबागमधून ताब्यात घेतले. ही कारवाई आरसीएफ कर्मचारी वसाहतीमध्ये करण्यात आली असून, ताब्यात घेण्यात आलेले दोघे एका कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे.
एकीकडे आरसीएफचे कर्मचारी आणि मेडिकल कॉलजचे विद्यार्थी यांनाच वसाहतीमध्ये परवानगी असताना चोरटे आत घुसलेच कसे, असा सवाल उपस्थित होत आहे. या घटनेनंतर आरसीएफ प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध नाशिक पोलीस घेत होते. तपासादरम्यान घरफोडी करणारे दोघेजण अलिबागमध्ये त्यांच्या नातेवाईकांकडे लपून बसल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच नाशिक पोलिसांच्या पथकाने गुरुवारी अखेर अलिबाग गाठले. अलिबाग पोलिसांच्या मदतीने लपलेल्या दोन्ही चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी आरसीएफ कर्मचारी वसाहतीपर्यंत मजल मारली.
अलिबागमधील आरसीएफ कर्मचारी वसाहतीमध्ये चोरटे लपल्याची माहिती मिळताच अलिबाग पोलीस आणि नाशिक पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकला. पोलिसांच्या या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपी हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील असून, त्यांचे नातेवाईक आरसीएफमध्ये कंत्राटी कर्मचारी असल्याची माहिती आहे. आरसीएफ कर्मचारी वसाहतीमध्ये राहात असलेल्या नातेवाईकांकडे हे दोघेजण लपून बसल्याचे पोलिसांनी सांगितले. नाशिक आणि अलिबाग पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.






