उपअभियंत्यापासून कार्यकारी अभियंत्याविरोधात महिलांचा एल्गार
। अलिबाग । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील सुकेळी येथील जलजीवनचे काम अपूर्ण स्थितीत आहे. करोडो रुपयांची ही योजना मुदतीमध्ये पूर्ण करण्यास यंत्रणा उदासीन ठरली. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थ व महिलांनी जिल्हा परिषदेसमोर ठेकेदारासह ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांच्याविरोधात निषेध व्यक्त करीत एल्गार पुकारला आहे. अलिबागमधील जिल्हा परिषद कार्यालयासमोर शुक्रवारी (दि. 24) लाक्षणिक उपोषण करीत प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील जलजीवन योजना कायमच वादाच्या भोवर्यात सापडत आहे. विहीर, तलाव तयार करण्यात आले आहेत. पाईप टाकण्यात आले आहेत. परंतु, पाणीच घरात पोहोचले नाही. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही ही योजना बारगळ्याची प्रतिक्रिया अनेक गावांतील महिलांकडून व्यक्त होत आहेत. जलजीवन योजना ठेकेदारासाठी राबविली, असा आरोप अनेकांकडून केला जात आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील सुकेळी गावात जलजीवन योजना राबविण्यात आली असून, ती अर्धवट स्थितीत आहे. महिलांनी या योजनेच्या कामाबाबत संताप व्यक्त करीत गेल्या वर्षभरापासून शासन दरबारी चपला झिजवल्या आहेत. अनेक वेळा जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांना पत्र दिले आहे. ग्रामपंचायत ऐनघर, पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत अनेक वेळा बैठका झाल्या. परंतु, अधिकारी प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरल्याची प्रतिक्रिया उमटत आहेत. 24 जानेवारी 2024 मध्ये योजनेचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु, एक वर्ष उलटूनही या योजेची अवस्था जैसे थे अशीच आहे. या गावांतील अनेक नागरिकांना विशेष करून महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जलजीवन योजनेंतर्गत पाणी दिल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात नळांना पाणीच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सुकेळी येथील ग्रामस्थ, महिलांनी जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता वेंगुर्लेकर, रोहा येथील उपअभियंता, ठेकेदार, ऐनघर ग्रामपंचायतीच्या विरोधात निषेध व्यक्त करीत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण पुकारले. यावेळी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांविरोधात घोषणा देत त्यांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी दिक्षिता तेलंगे, दिक्षा दंत चैत्राली झोलगे, संगिता तेलंगे, सुवर्णा तेलंगे आदी महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.