। श्रीवर्धन । वार्ताहर ।
अलिकडे जिल्हा परिषदेच्या व काही अन्य प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी संख्या रोडावत चालल्याचे वाचनात येते. या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये मात्र समाधानकारक किंबहुना वाढती विद्यार्थी संख्या असल्याचे दिसून येते.
अनेक नगर परिषदा व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुदती संपून गेल्यामुळे अशा सर्व संस्थांमध्ये गेली काही वर्षे प्रशासकीय कारभार चालू आहे.तसाच तो श्रीवर्धन नगर परिषदेमध्येही आहे. मुख्याधिकारी विराज लबडे यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेस गेल्या एक-दोन वर्षांत नगर स्वच्छतेची व अन्य पारितोषिकेही मिळाली आहेत. नगर परिषदांच्या अधिपत्याखाली जिथे शाळा चालविल्या जातात तिथे न.प.ची वेगळी शिक्षण मंडळे असतात. परंतु गेली काही वर्षे श्रीवर्धन नगरपरिषदेचे वेगळे शिक्षण मंडळ अस्तित्वात नाही.
शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी यांच्या अधिपत्याखाली श्रीवर्धन न.प.शिक्षण विभागाचा कारभार चालतो. न.प.शिक्षण विभागाकडून प्राप्त माहितीनुसार साधारणपणे 2018 नंतर येथे कोणीही नियमित प्रशासन अधिकारी आलेले नाहीत.तर अन्य तालुक्याच्या प्रशासन अधिकार्यांकडे येथील कारभार प्रभारी प्रशासन अधिकारी म्हणून सोपविला जातो.सध्या मुरुड शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी दिपाली दिवेकर यांचेकडे श्रीवर्धन न.प.शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार आहे.
श्रीवर्धन न.प.शिक्षण मंडळाच्या शहरांत एकूण 05 प्राथमिक शाळा असून त्यापैकी शाळा क्र. 1 मध्ये पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत तर अन्य शाळांमध्ये इयत्ता चौथीपर्यंत वर्ग आहेत.या पाच शाळांमध्ये सध्या एकूण 549 विद्यार्थी- विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.अन्य न.प.च्या प्राथ.शाळांमध्ये शिक्षण घेणार्या विद्यार्थी संख्येपेक्षा तुलनेने ही संख्या समाधानकारक आहे असे सांगण्यात आले. याशिवाय न.प.च्या 06 अंगणवाड्याही असून त्यातील विद्यार्थी संख्या सुमारे 300 इतकी आहे.
श्रीवर्धन न.प.शाळांसाठी शिक्षकांची एकूण 25 पदे मंजूर असून त्यापैकी 21 शिक्षक कार्यरत आहेत. रिक्त जागाही लवकरच भरण्यात येतील असे समजले. न.प.शाळांच्या इमारती त्यातील भौतिक सुविधा व गरजा यांकडे मुख्याधिकारी विराज लबडे यांचेकडून समाधानकारकपणे लक्ष देण्यात येत असते असे त्यांचेशी चर्चा करताना जाणवले. या सर्व शाळांना स्वतःच्या इमारती आहेत ही मोठी जमेची बाजू आहे.