मूलभूत सुविधांसाठी कळंबोलीकरांची फरफट

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

प्रशासनाकडून जबाबदारी ढकलण्याचा आरोप

| कळंबोली | प्रतिनिधी |

कळंबोली शहरातील नागरिकांना सध्या दोन अत्यावश्यक मूलभूत सुविधांसाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे पाणीपुरवठा अनियमित होत असून, दुसरीकडे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “कधी लाईट नाही तर कधी पाणी नाही, नेमके करायचे काय?” असा संतप्त सवाल कळंबोलीकरांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच, पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडेबोट दाखवले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यांच्याकडून अपेक्षित प्रमाणात किंवा नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचे कारण देण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

कळंबोलीसारख्या झपाट्याने विकसित होत असलेल्या शहरामध्ये नागरिकांना नियमित पाणी आणि अखंडित वीजपुरवठा मिळणे ही प्राथमिक गरज आहे. मात्र, पाणी आणि वीज या दोन्ही मूलभूत सुविधांबाबत नागरिकांना वारंवार अडचणींचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, पाण्याच्या प्रश्नावर एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे बोट दाखवले जात असताना नागरिकांची मात्र गैरसोय सुरूच आहे. घरगुती वापरासाठी, पिण्यासाठी तसेच दैनंदिन गरजांसाठी पाणी मिळवताना नागरिकांना नियोजन करावे लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

तसेच, पाण्याच्या समस्येबरोबरच कळंबोलीत वीजपुरवठ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. महावितरणकडून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून, प्रत्येक वेळी ‌‘मेन लाईन केबल फॉल्ट‌’ झाल्याचे कारण सांगितले जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर काही काळाने वीजपुरवठा सुरू होतो; मात्र, पुन्हा त्याच स्वरूपाची समस्या निर्माण होत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजना केव्हा होणार, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. वारंवार होणाऱ्या वीजखंडिततेमुळे घरगुती ग्राहकांसह दुकानदार, व्यावसायिक आणि विविध आस्थापनांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. केबलमध्ये वारंवार बिघाड होत असेल, तर त्यावर कायमस्वरूपी उपाय का केला जात नाही, अशीही नागरिकांची भूमिका आहे.

एकीकडे पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडेबोट दाखवले जात आहे. तर, प्राधिकरणाकडून अपेक्षित प्रमाणात किंवा नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचे कारण देण्यात येत आहे. तर, दुसरीकडे वीजपुरवठा खंडित झाल्यावर केबल फॉल्टचे कारण पुढे केले जात आहे. पाणी आणि वीज या जीवनावश्यक सुविधा नियमित आणि सुरळीत उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याऐवजी समन्वयाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Exit mobile version