। नेरळ । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यातील सेंट जोसेफ शाळेत जाणार्या स्कूल बसमध्ये बसच्या क्लिनरकडून तीन मुलींची लैंगिक छळवणूक करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी पाच वर्षाच्या मुलींची लैंगिक छळवणूक करणार्या त्या तरुणाला अटक केली आहे. असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी कर्जत शिक्षण विभागाकडून सर्व शाळांच्या समन्वय सभा सोमवारी (दि.21) आयोजित केल्या आहेत. कर्जत शिक्षण विभागाने त्या सभेसाठी पुढाकार घेतला असून, ते बैठकीत स्कूल बसबद्दल अनेक महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत.
खालापूर तालुक्यातील सेंट जोसेफ स्कूलमध्ये घडलेल्या प्रकरणानंतर पालक, शिक्षक व संस्था चालक यांच्या सोबत बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नियमावली तयार करण्यासाठी शिक्षण विभागाकडून पावले उचलली जात आहेत. पोलीस प्रशासन सतर्क झाले असून सर्व पातळीवर जागरूकता कायम ठेवण्यासाठी नियमावली बनविण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकार्यांच्या सूचनेनुसार कर्जत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संतोष दौंड यांनी संस्था चालक, पालक यांची बैठक बोलावली आहे.ही बैठक कर्जत शहरातील गुंडगे भागात असलेल्या डॉन बॉस्को शाळेत होणार आहे. या बैठकीसाठी सर्व केंद्रप्रमुख तसेच जिल्हा परिषद शाळा आणि माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक यांच्याशी विनाअनुदानित अनुदानित आणि खासगी शाळा यांचे सर्व व्यवस्थापन यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्याचवेळी प्रती शाळा एक पालक प्रतिनिधी, एक शिक्षक प्रतिनिधी तसेच स्कूल बस चालक मालक संघटनेचे प्रतिनिधी यांना बोलावण्यात आले आहे.