कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी
। नेरळ । प्रतिनिधी ।
मध्य रेल्वेचे मेन लाईन वरील मुंबई-पुणे मार्गावरील कर्जत दिशेकडे जाणार्या प्रवाशांच्या सोयीसाठी कल्याण ते कर्जत अशी शटल सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
नेरळ रेल्वे प्रवासी संघटना यांच्या माध्यमातून या मागणीचे निवेदन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना देण्यात आले आहे. दरम्यान, कर्जत आणि नेरळ जंक्शन या दोन रेल्वे स्थानकाची नामकरण कर्जत तालुक्यातील हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील असे करावीत अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेचे मेन लाईनवर कर्जत दिशेकडे प्रवास करणार्या सर्वसामान्य प्रवासी, महिला प्रवासी आणि विद्यार्थी यांना मोठी कसरत करावी लागते. कर्जत येथून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणार्या उपनगरीय लोकल या सकाळच्या वेळी कामगार वर्गाच्या गर्दीमुळे खचाखच भरलेल्या असतात.
त्यामुळे नेहमी प्रवास करीत नसलेल्या प्रवाशांना मोठी कसरत करावी लागते. त्यात वांगणी, शेलू, नेरळ आणि भिवपुरी तसेच कर्जत, खोपोली भागात नव्याने मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. मुंबईचे उपनगर म्हणून या सर्व स्थानकाच्या परिसरात वाढलेली लोकसंख्या लक्षात घेवून उपनगरीय लोकल यांची संख्या वाढणे आवश्यक झाले आहे. मात्र मागील 15 वर्षात एकही नवीन लोकल कर्जत साठी वाढलेली नाही. मात्र लोकसंख्या मागील 15 वर्षाच्या तुलनेत तिप्पट झाली आहे. यासर्व बाबींचा मध्य रेल्वेचे प्रशासनाने विचार करून कर्जत लोकलची संख्या वाढवणे अत्यंत गरजेचे होते. मुंबईचे उपनगर म्हणून विकसित झालेल्या कर्जत येथून रात्री पावणे अकरानंतर एकही उपनगरीय लोकल मुंबईसाठी सोडली जात नाही. रात्री अकरापासून पहाटे अडीचपर्यंत कर्जत येथून मुंबईकडे जाणारी एकही लोकल नाही.
स्थानकांचे नामकरण करा
कर्जत तालुक्याला देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास असून या तालुक्यातील बॅरिस्टर विठ्ठलराव तथा भाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील हे हुतात्मा झाले.या दोन्ही हुतात्म्यांची नावे कर्जत आणि नेरळ रेल्वे स्थानकात द्यावी अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे.नेरळ प्रवासी संघटनेचे वतीने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिलेल्या निवेदनात कर्जत स्थानकाच्या हुतात्मा भाई कोतवाल रोड स्थानक तर नेरळ जंक्शन स्थानकाचे हुतात्मा हिराजी पाटील रोड स्थानक असे नाव देण्यात यावे अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
घेत आहे.