| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत हे मुंबई – पुणे दरम्यानचे मुख्य रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे या स्थानकावर प्रवाशांची खूप गर्दी असते. या स्थानकातील पुणे बाजूकडील मुख्य पूल तांत्रिक कामा निमित्त तब्बल महिनाभर बंद करण्यात आला असून दोन, तीन व ईएमयू फलाटावर जाणार्या व येणार्या प्रवाशां बरोबरच भिसेगाव, गुंडगे परिसरातील नागरिकांची खूप गैरसोय होत असून शॉर्टकट म्हणून रूळ ओलांडताना अपघात होण्याची शक्यता आहे.
स्थानकातून दररोज हजारो विद्यार्थी, चाकरमानी, व्यावसायिक प्रवास करीत असतात. या स्थानकात असलेला पुणे बाजू कडील पुलाचे तांत्रिक काम निघाल्याने हा पूल पूर्णपणे बंद केला आहे. हा पूल बंद केल्याने दररोज घाईघाईने गाडी पकडण्यासाठी जाणार्या प्रवाशांचे अतोनात हाल सुरू झाले आहेत. तसेच पलीकडच्या बाजूला भिसेगाव, गुंडगे ही नगरपरिषद हद्दीतील गावे आहेत. रेल्वेच्या म्हणण्यानुसार पूर्व बाजूला असलेली तिघर, वर्णे, पळसदरी, वावर्ले, खैराट, बोरगाव, हातनोली, चौक आदी गावातील प्रवासी रिक्षा किंवा एसटी ने येतात त्यांना हा पुलच सोईस्कर आहे. त्यांना बाजारपेठेत येण्यासाठी या पुलावरूनच यावे – जावे लागते. पर्यायी मार्गाने यायचे झाल्यास सुमारे दोन किलोमीटरचा वळसा घ्यावा लागेत आहे.
महिनाभर हा पूल बंद असणार आहे. त्यासाठी पर्यायी मार्गाने मुंबई बाजूकडील पुलाचा वापर करायचा ठरवल्यास फलाटावरून जाताना विना तिकीट म्हणून पकडले जाण्याची शक्यता आहे. लांबपल्ल्याच्या गाड्या एक नंबर फलाटावर येतात मात्र कधी कधी त्या दोन किंवा तीन नंबर फलाटावर आणाव्या लागतात. त्यावेळी प्रवाशांचे होणारे हाल बघवत नाहीत. तर लांबपल्ल्याच्या पुण्याकडून येणार्या गाड्या दोन किंवा तीन नंबर फलाटावर येतात. त्यांची खूप गैरसोय होते. त्यातच कर्जतहून खोपोली कडे जाणार्या व खोपोलीहून कर्जतला येणार्या गाड्या दोन, तीन नंबरच्या फलाटावर येतात. तर मुंबईहून कर्जतला येणार्या बहुतांश लोकल ईएमयू फलाटावर किंवा दोन किंवा तीन नंबरच्या फलाटावर येतात. त्याप्रवाशांचे कुटुंब कबिल्यासह येता – जाता खूपच हाल होतात. हा पूल एक महिन्यासाठी बंद केला आहे. मात्र एक महिन्यात तरी काम होईल ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा पूल नव्याने बांधला आहे मग हा पूल बंद का करण्यात आला आहे? पनवेल साठी वेगळी लाईन टाकण्यासाठी हा पूल बंद करण्यात आला आहे काय? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत.
काही कामा साठी पुणे बाजूकडील पूल 30 दिवसांसाठी बंद करण्यात आला आहे. तो पर्यंत लोकल गाड्या एक नंबर फलाटावर आणाव्यात म्हणजे प्रवाशांचा त्रास थोडा कमी होईल. – पंकज ओसवाल, सामाजिक कार्यकर्ते
पूल कामानिमित्त बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आमच्या सारख्या आजारी असलेल्या जेष्ठ नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वेने नियम थोडा बाजूला ठेऊन पर्यायी मार्ग केल्यास आमची थोडीतरी सोय होईल. – प्रभाकर करंजकर,ज्येष्ठ नागरिक