| आगरदांडा | प्रतिनिधी |
काशिद ग्रामपंचायत हद्दीत सोमवारी (दि.7) सकाळच्या दरम्यान 5 फुटापेक्षा जास्त उंचीचा व साधारण 150 किलो वजनाच्या जिवंत सांबराचा नागरिकांच्या समोर मृत्यू झाला. या घटनेने प्राणीमित्र तसेच ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मुरुड अभयारण्य क्षेत्रातील एक सांबर भरकटत काशिदमध्ये आला. गवताळ भागात चरत असताना कुत्र्याच्या आवाजाने घाबरून तेथील ग्रामस्थ महाडीक यांच्या कंपाऊंडमध्ये शिरला. घाबरलेल्या अवस्थेत दिसल्याने काही ग्रामस्थांनी तिथे येऊन त्याला दोरीने बांधून ठेवले. जेणे करुन त्याच्यावर कुत्रा व अन्य प्राणी हल्ला करु नये. त्या सांबरावर उपचार करणे शक्य होईल. तद्नंतर ग्रामस्थांपैकी एकाने वनविभागाला याबाबतची माहिती दिली. वनविभागाचे विजु कोसंबे व आदिंसह घटनास्थळी आले. परंतु काही वेळाने घाबरलेल्या जिवत सांबराने डॉक्टर येण्याच्या आधीच आपला जीव सोडला. मृत्यू झालेल्या सांबराचा अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले.
सांबर सर्वात घाबरट प्राणी आहे. उपचार योग्य वेळी मिळाले असते तर त्याचे प्राण वाचले असते .परंतु उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याने सर्पमित्र तथा प्राणी मित्र संदीप घरत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सांबराचा मृत्यूचे आम्हालाही दुःख आहे. मृत्यू झालेल्या सांबराच्या शरीरावर जखम आढळून आली नाही तरी पण येथील डॉक्टर त्याची तपासणी करीत आहेत.
प्रियांका पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी