कातकरी उत्थान अभियानाचा शुभारंभ

| माणगाव । वार्ताहर ।
माणगाव तालुक्यामध्ये महाराजस्व अभियानास प्रारंभ झाला असून त्याअंतर्गत दि.16 डिसेंबर रोजी माणगाव तालुक्यातील एकलव्यनगर (चांदे) आदिवासीवाडी येथे कातकरी उत्थान अभियान माणगाव उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर व तहसिलदार प्रियंका आयरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आले.


माणगाव तालुक्यामध्ये एकूण 98 कातकरी वाड्या असून सुमारे 20 हजार इतकी आदिवासी लोकसंख्या आहे. शासनाच्या सर्व योजनांची यशस्वी अंमलबजावणी करुन आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावणे, स्थलांतर रोखणे, आरोग्य विषयक जनजागृती करणे, व्यसनाधीनता, बालविवाह रोखणे तसेच रोजगार निर्मिती करुन आदिवासी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे इत्यादी व्यापक उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कातकरी उत्थान अभियान अधिक गतिमान करण्यासाठी माणगाव तालुक्यातील सर्वच आदिवासी वाड्यांवर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेे. प्रत्येक आदिवासी वाडीसाठी एक पालक अधिकारी नियुक्त करण्यात आला आला आहे. या अभियानाचा शुभारंभ चांदे एकलव्यनगर (चांदे) आदिवासीवाडीवर झाला असून यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. या शिबिरामध्ये वयाचे दाखले-69, आधारकार्ड नोंदणी-11, वाहन परवाना-9, जॉबकार्ड-13, शिधापत्रिकेमध्ये नाव वाढविणे-26 इत्यादी लाभ देण्यात आले.याप्रसंगी तालुक्यातील सर्व प्रशासकीय प्रमुख, सर्व विकासदीप संस्थेचे संचालक रिची भाऊ, महेश मोरे, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version