। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल रेल्वे स्थानक परिसरात वावरणार्या एका अज्ञात इसमाने रात्रपाळीवरून घरी परतणार्या एका व्यक्तीवर हल्ला करून त्याला लुटण्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, फिर्याददार भास्कर ढेकले (40) सकाळ मिडीयाच्या तळोजा येथील प्रेसमध्ये सीटीपी प्रोसेस ऑपरेटर म्हणून काम करतात. कामावरून परतण्यासाठी पनवेल रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र 1 जवळच्या संरक्षण भिंतीच्या मध्यभागी असलेल्या पायवाटेने आपल्या घरी जात होते. यावेळी एकाने तंबाखु मागण्याच्या बहाण्याने त्यांना अडविले. ढेकले यांनी त्याला नकार दिल्यानंतर या लुटारुने त्यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्या खिशात असलेला मोबाईल फोन व रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला.
ढकले यांनी त्याला विरोध केल्यानंतर सदर लुटारुने बाजुलाच पडलेल्या डेब्रिज मधील सिमेंटचा ब्लॉक उचलून त्यांच्या डोक्यात मारुन त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर त्या ठिकाणावरुन पळ काढला. ढेकले यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.