पटकावले सर्वोत्तम राज्य विजेतेपद
। हल्दवानी । क्रीडा प्रतिनिधी ।
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचे द्विशतक झळकविणार्या महाराष्ट्राला सर्वोत्तम राज्य विजेतेपदाच्या करंडकाने गौरविण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्राला राज्य विजेतेपदाचा करंडक देण्यात आला.
इंदिरा गांधी स्टेडियममध्ये 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप सोहळा रंगला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र ऑलिम्पिक असो.चे (एमओए) महासचिव नामदेव शिरगावकर यांनी सर्वोत्तम राज्य विजेतेपदाच्या करंडका स्वीकारला आहे. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मंडेलिया, भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्ष पी.टी. उषा, उत्तराखंडच्या क्रीडामंत्री रेखा आर्या, महाराष्ट्र संघाचे पथकप्रमुख संजय शेटे, उदय डोंगरे, विठ्ठल शिरगांवकर उपस्थित होते.
उत्तराखंडातील स्पर्धेत महाराष्ट्रने 54 सुवर्णांसह 71 रौप्य व 76 कांस्य अशी एकूण 201 पदकांची लयलूट करीत पदकतक्यात दुसरे स्थान मिळविले आहे. स्पर्धेत सलग तिसर्यांदा राज्यातील संघांमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. याआधी अहमदाबाद, गोवा आणि आता उत्तराखंड स्पर्धेत महाराष्ट्रने देशात अव्वल येण्याची ऐतिहासिक हॅट-ट्रिक साजरी केली आहे. यावेळी तब्बल 27 क्रीडाप्रकारात महाराष्ट्राने पदके जिंकण्याची कामगिरी केली आहे. महाराष्ट्राने जिम्नॉस्टिक्समध्ये सर्वाधिक 12 सुवर्णांसह 24 पदके जिंकली आहेत. तसेच, महाराष्ट्राने कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असो.चे अध्यक्ष अजित पवार, क्रीडामंत्री दत्तामामा भरणे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वाधिक 201 पदकांची कमाई करणारा महाराष्ट्र देशातील एकमेव संघ ठरला आहे, सर्वोत्तम संघाचा मानही आपण पटकविला आहे. महाराष्ट्राच्या पदकविजेत्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सलग तिसर्यांदा राज्यांच्या संघात अव्वल स्थान संपादन केले आहे. देशात पुन्हा महाराष्ट्राचा जयजयकार होत असल्याचा मोठा आनंद आहे.
– नामदेव शिरगावकर, महासचिव,
महाराष्ट्र ऑलिम्पिक असो.