। रसायनी । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संलग्न पेण पत्रकार संघाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी पेणच्या छ. शिवाजी महाराज मैदानावर एक दिवसीय क्रिकेट सामान्यांचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट सामन्याला जिल्ह्यातील पत्रकारांचा उत्स्फुर्त सहभाग लाभला. तसेच, अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हे सामने पार पडले.
या स्पर्धेतील अंतिम सामना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रोहा व गोरेगाव प्रेस क्लब यांच्यात झाला. यावेळी एका चेंडूत सहा धावांची गरज असताना गोरेगांव संघाच्या खेळाडूने षटकार लगावल्याने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या क्रिकेट स्पर्धेतील चषकावर आपले नाव कोरले आहे. तर, द्वितीय क्रमांकावर रोहा संघाला समाधान मानावे लागले. तसेच, तृतीय क्रमांक अलिबाग संघाने पटकावला आहे. या सामन्यातील सामनावीर रोहा संघातील आशिष मोरे ठरला. तर, उत्कृष्ट फलंदाज पेण संघाचा मंथन पाटील, उत्कृष्ट गोलंदाज गोरेगाव संघाचा आदिनाथ आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गोरेगाव संघाचे प्रणित हे ठरले आहेत.