। डेहराडून । क्रीडा प्रतिनिधी ।
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पुन्हा एकदा विजेतेपद जिंकण्यासाठी महाराष्ट्राने आपली पदकांची घोडदौड कायम ठेवली आहे. स्पर्धेच्या सहाव्या दिवशी महाराष्ट्राने पदकांचा अर्धशतकाचा पल्ला पार करीत पदकांचा सुवर्णमहोत्सव साजरा करताना 13 सुवर्णांसह 22 रौप्य, 15 कांस्यपदकांची लयलूट केली आहे. याचबरोबर महाराष्ट्राने राष्ट्रीय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दुसर्या स्थानावर झेप घेतली आहे. स्पर्धेत सर्वाधिक पदके जिंकण्याची कामगिरीही महाराष्ट्र संघाने पहिल्या दिवसापासून कायम राखली होती. सुवर्णपदकांची संख्या कमी असल्याने शुक्रवारपर्यंत महाराष्ट्र तिसर्या स्थानावर होता. 1 फेब्रुवारीला सकाळच्या सत्रात खो-खोमधील 2 व डायव्हिंगमधील ऋतिका श्रीरामच्या पदकामुळे सर्वाधिक 10 पदके जिंकण्याचा करिश्मा महाराष्ट्र संघाने घडवून अव्वल स्थान गाठले होते.
तसेच, महाराष्ट्राने जलतरणात 5, सायकलिंग मध्ये 1, ट्रायथलॉनमध्ये 2, नेमबाजीत 2, खो-खोत 2, स्क्वॉशमध्ये 1 अशी 13 सुवर्णपदके पटकावली आहेत. एकट्या जलतरण स्पर्धेत 5 सुवर्णपदकांसह 20 पदकांची कमाई केली आहे. त्याचबरोबर कबड्डी, वुशु, रग्बी, वेटलिफ्टिंग, योगा खेळातही महाराष्ट्राने पदकांची कामगिरी केली आहे. तसेच, वैष्णव ठाकूर या 23 वर्षीय खेळाडूने 38 वेटलिफ्टिंगमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवित रुपेरी कामगिरी केली आहे.