अवकाळी वादळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान

दर्यागाव जि.प. शाळेचीदेखील पडझड

। सुधागड-पाली । वार्ताहर ।

रायगड जिल्ह्यासह सुधागड तालुक्यातील अनेक गावांना शुक्रवारी (दि.4) सायंकाळी अवकाळी मुसळधार वादळी पावसाने झोडपले. त्यामुळे येथील आंबा पीक व बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच, दर्यागाव जिल्हा परिषद शाळेची पडझडदेखील झाली आहे. सुदैवाने शाळेत मुले नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

तालुक्यातील नाडसूर, धोंडसे, पाच्छापूर, दर्यागाव, कळंब व इतरही अनेक गावात वादळी पावसाने धुमाकूळ घातला. आंबा बागायतदारांचे हातातोंडाशी आलेले पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले आहे. कलमांचेदेखील नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील आंबा बागायतदार व शेतकरी हवालदिल झाला असून शासनाकडे नुकसान भरपाईची याचना करीत आहे. याशिवाय दर्यागाव येथील जिल्हा परिषद शाळेची पडझड झाली आहे. या शाळेचे पत्रे उडाले असून भिंतीला तडे गेले आहेत. त्याचप्रमाणे तालुक्यात विविध गावांमध्ये अशा प्रकारे अवकाळी वादळी पावसामुळे नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी व ग्रामस्थ शासनाकडे यासंदर्भात माहिती देत आहेत.

अवकाळी वादळी पावसामुळे सुधागड तालुक्यात अनेक आंबा बागायतदार व शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. तसेच, काही ठिकाणी घरांचे व शाळेचे देखील नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ या नुकसानीचे पंचनामे करून शेतकरी व बागायतदारांना तसेच नागरिकांना योग्य तो मोबदला द्यावा.

– ऋषी झा, कृषी सल्लागार, पाली

Exit mobile version