ई-रिक्षासाठी माथेरानकर एकवटले; दिवसभर कडकडीत बंद

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानमध्ये व्यापारी वेल्फेअर असोसिएशनच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिक, हॉटेल असोसिएशन, लॉजिंग संघटना, रिक्षा चालकमालक संघटना या सर्वांनी एकत्रित येऊन ई-रिक्षाच्या समर्थनार्थ सोमवारी (दि.3) माथेरान बंद ठेऊन नगरपालिकेवर भव्य मोर्चा काढला आणि निवेदन सादर केले.

सर्वोच्च न्यायालयाने माथेरान मध्ये पर्यावरणपूरक ई-रिक्षा तीन महिन्यांच्या प्रयोगिग तत्वावर सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु ई-रिक्षा सुरू झाल्यास येथील अश्‍वपालकांचा व्यवसाय धोक्यात येऊ शकतो यासाठी येथील अश्‍वपाल संघटनेकडून ई-रिक्षाला विरोध केला जात आहे. या विरोधाला न जुमानता येथील स्थानिक नागरिक, सर्व राजकीय पक्ष, हॉटेल असोसिएशन लॉजिंग संघटना, रिक्षा चालक मालक संघटना या सर्वांनी एकत्रित येऊन ई-रिक्षाच्या समर्थनार्थ माथेरान मधील व्यापारी वेल्फेअर असोसिएशनच्या नेतृत्वाखाली दुपारी 3 वाजेपर्यंत माथेरान बंद ठेऊन भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा येथील कम्युनिटी सेंटर येथून नगरपालिकेवर काढण्यात आला. ई-रिक्षाच्या समर्थनार्थ येथे मोर्चा मध्ये शेकडोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

या मोर्चा बद्दल माथेरान व्यापारी वेल्फेअर असोसिएशन कडून येथील स्थानिक प्रशासनाला पूर्व कल्पना देण्यात आली होती.त्यामुळे मोर्चामध्ये कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये या करिता माथेरान पोलिस प्रशासन देखील सतर्क होते.अगदी संयमाने आणि शांततेत मोर्चा यशस्वी झाला.दुपारी तीन नंतर माथेरान मधील सर्व दुकाने उघडण्यात आली आणि सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले.

माथेरान व्यापारी संघटनेच्या माध्यमातून समर्थन मोर्चाचे आयोजन केले होते. भाजप, आर पी आय, काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, मनसे, शेकाप, ज्येष्ठ नागरिक संघ, दिव्यांग सेवा संघटना, धोबी समाज, लॉजिंग चालक मालक संघटना, कुशल कामगार संघटना, स्टेशन हमाल संघटना, गुजराती समाज, रग्बी विभाग रहिवाशी, वन ट्री हिल विभाग रहिवासी, भारतीय सफाई मजदूर काँग्रेस, रिक्षा संघटना, युवा रुखी गुजराती समाज, भारतीय बौद्ध महासभा, चर्मकार समाज, सेंट झेवीयर्स पालक माथेरान गव्हाणकर एजुकेशन ट्रस्टच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील,संघ व हॉटेल असोसिएशन यांनी उस्फूर्त सहभाग नोंदणून ई रिक्षाला पाठिंबा दिला माथेरानच्या नागरिकांनी आज सर्व व्यवहार बंद ठेवून या मोर्चात सहभाग घेतला.


माथेरान नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांना संघटनेच्यावतीने राजेश चौधरी यांनी निवेदन दिले. यावेळी माथेरानचे अधिक्षक दिक्षांत देशपांडे, माथेरान पोलीस स्टेशन उपनिरीक्षक शेखर लव्हे उपस्थित होते. यावेळी मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी 15 ऑक्टोबर पर्यंत ई रिक्षा सुरू करण्याचे आश्‍वासन उपस्थितीत संघटनेच्या पदाधिकारी यांना दिले.

हा मोर्चा नसून क्रांती आहे. संपूर्ण गाव आपल्या पाठीशी आहे. मोर्चा कोणाच्या विरोधात नाही. न्यायालयाने दिलेल्या आदेश आपण लवकरात लवकर अमलात आणावा आणि सर्व प्रथम येथील महात्मा गांधी हा मुख्य रस्ता चांगल्या पद्धतीने जलद गतीने क्ले-पेव्हर ब्लॉक मध्ये तयार करा. जेणे करून ई-रिक्षा पायलेट प्रोजेक्टला अडथळा येणार नाही.

राजेश चौधरी
अध्यक्ष, व्यापारी वेल्फेअर असोसिएशन

उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सनियंत्रण समितीच्या बैठकीत अनेक सूचना पालिकेला करण्यात आल्या आहेत. आणि आता ई-रिक्षा पायलेट प्रोजेक्टला आरटीओ मान्यता सुद्धा प्राप्त झाली आहे. ई-रिक्षा साठी थांबा, दर पत्रक, चार्जिंग स्टेशनची कामे सुरू आहेत. हा ई-रिक्षा प्रोजेक्ट लवकर सुरू केला जाईल.

सुरेखा भणगे,मुख्याधिकारी
Exit mobile version