अखंड वीजपुरवठ्यासाठी उपाययोजनांवर चर्चा
| रेवदंडा | प्रतिनिधी |
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर रेवदंडा तसेच अलिबाग परिसरातील नागरिकांना अखंड आणि सुरळीत वीजपुरवठा मिळावा, यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात असून, याच अनुषंगाने 10 जून रोजी मुंबई येथील भांडुप परिमंडळ महावितरण कार्यालयात विशेष बैठक पार पडली.
या बैठकीत महावितरणचे सहाय्यक महाव्यवस्थापक रहांगदले यांची भेट घेऊन रेवदंडा महावितरणचे उपअभियंता जितेंद्र पाटील आणि रेवदंडा ग्रामपंचायतीचे उपसरपंच संतोष उर्फ बाबू मोरे यांनी रेवदंडा व अलिबाग परिसरातील वीजपुरवठ्याच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. बैठकीत विशेषतः पावसाळ्यात उद्भवणारे वीज खंडित होण्याचे प्रकार, जुन्या वीजवाहिन्यांची दुरुस्ती, तांत्रिक बिघाडांवर तातडीने उपाययोजना, झाडांच्या फांद्यांमुळे होणारे अडथळे, वाढत्या वीज मागणीच्या पार्श्वभुमीवर आवश्यक पायाभूत सुविधा आणि आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसाद यासंदर्भातील मुद्दे मांडण्यात आले.
उपसरपंच संतोष मोरे यांनी रेवदंडा ग्रामस्थांच्या वतीने नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणींची माहिती देत, वीजपुरवठा अधिक सक्षम व विश्वासार्ह करण्याची मागणी केली. यावर सहाय्यक महाव्यवस्थापक रहांगदले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. रेवदंडा हे पर्यटन आणि मत्स्यव्यवसायासाठी महत्त्वाचे केंद्र असल्याने येथील वीजपुरवठा सुरळीत राहणे अत्यंत गरजेचे आहे. वीज खंडित झाल्यास नागरिकांसह व्यावसायिक, मच्छीमार, व्यापारी आणि पर्यटन व्यवसायावर परिणाम होतो. त्यामुळे या बैठकीकडे रेवदंडा आणि अलिबाग परिसरातील नागरिक आशेने पाहत आहेत.
दरम्यान, रेवदंडा ग्रामपंचायत आणि महावितरण प्रशासन यांच्यातील समन्वयामुळे आगामी काळात वीजपुरवठ्याच्या समस्या कमी होतील आणि नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामस्थांच्या वीज समस्यांबाबत आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. रेवदंडा व अलिबाग परिसरातील नागरिकांना अखंड आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच त्याचे परिणाम दिसून येतील.
संतोष उर्फ बाबू मोरे,
उपसरपंच, रेवदंडा ग्रामपंचायत.







