भुस्खलनाच्या धोक्यामुळे चरईतील ग्रामस्थांचे स्थलांतर; प्रशासनाकडून कार्यवाही

| पोलादपूर | प्रतिनिधी |
तालुक्यातील रानवडी रानबाजिरे धरणाच्या वरील बाजूच्या चरई ग्रामपंचायत हद्दीतील वडाचा कोंड गावालगत शनिवारी डोंगराला भेगा पडल्याने खबरदारी म्हणून तेथील ग्रामस्थांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले.यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली.

यासाठी ग्रामस्थांशी प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड,तहसिलदार दीप्ती देसाई , निवासी नायब तहसिलदार समीर देसाई ,महाड एमआयडीसीचे एपीआय आंधळे तसेच महाड कन्ट्रोलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार आणि पोलीस कर्मचार्‍यांना ग्रामस्थांची समजूत काढून सुरक्षितस्थळी हलवावे लागले.

रविवारी प्रशासनाने ग्रामस्थांसोबत चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली असता ग्रामस्थांनी आषाढातील कामिका एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर वारकरी माळकरी ग्रामस्थांनी दशमी खाऊन उपवास सोडण्याची तसेच श्रीविठ्ठलाचे भजन कीर्तन झाल्यानंतर घरातून बाहेर पडण्याची मानसिकता दर्शविली. ग्रामस्थांना डोंगराला पडलेल्या भेगांपेक्षा एकादशीव्रताचे माहात्म्य अधिक असल्याचे दिसून आले. त्यामुळे सरकारी प्रयत्न कमी पडत असल्याच्या शक्यतेमुळे प्रस्तुत प्रतिनिधीसह पोलादपूरचे निवासी नायब तहसिलदार समीर देसाई आणि पोलादपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी महाड एमआयडीसीचे एपीआय आंधळे तसेच महाड कन्ट्रोलचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक पवार आणि पोलीस कर्मचार्‍यांना चक्क ग्रामस्थांच्या मिन्नतवार्‍या करण्याची भुमिका घ्यावी लागली. सुमारे दीडशे ग्रामस्थांपैकी 75 ग्रामस्थ रानवडीच्या मंदिरामध्ये स्थलांतरीत करण्यात आली आणि सुमारे 67 ग्रामस्थांनी आपआपल्या नातेवाईक आप्तपरिवाराकडे आश्रय घेतला. यावेळी प्रशासनाकडून रानवडीच्या मंदिरात ग्रामस्थांना साबुदाण्याची खिचडी तसेच शाकाहारी जेवण वाढण्यात आले. मात्र, रात्री सर्वांनाच मच्छरांनी चावे घेऊन हैराण केल्याने सकाळी उजाडताच सर्वजण आपआपल्या घराकडे तातडीने परतले.

Exit mobile version