मिलिंद जाधवांनी छत्रपतींच्या प्रेरणेने सर केला भैरवगड

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील मोरोशी गावाजवळ असलेल्या अत्यंत अवघड आणि धोकादायक प्रकारात मोडणाऱ्या भैरवगडाची मोहीम रायगड जिल्ह्याच्या श्रीवर्धन तालुक्यातील दुर्गप्रेमी मिलिंद जाधव यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली.

शिवशौर्य ट्रेकर्सच्या वतीने आयोजित केलेल्या मोहिमेत मुंबई, ठाणे, आंबेजोगाई परिसरातील एकवीस गिर्यारोहकांनी सहभाग घेतला होता. इतर कोणत्याही गडदुर्गांच्या मोहिमेत किमान चाळीस-पन्नास ते अगदी दोनशेपर्यंत गिर्यारोहकांचा समावेश असतो. मात्र, भैरवगडाची चढाई अत्यंत अवघड असल्याने नियोजनाच्या दृष्टीने गिर्यारोहकांची संख्या मर्यादित ठेवली जाते. एका बाजूला डोळे भिरभिरायला लावणारी खोल दरी. या दरीलगत उंच कातळात खोदलेल्या जेमतेम एक माणूस जाईल अशा अरुंद पायऱ्या, त्यातल्या काही पायऱ्या 1818 साली इंग्रजांनी उध्वस्त केल्यामुळे इथली चढाई आणखीनच अवघड झाली आहे.

या पायऱ्यांच्या दुसऱ्या बाजूला अगदी खेटून असलेली उंच कातळ भिंत, काही ठिकाणी कातळभिंतीच्या कडेने खोदलेल्या जागेवर एक पाऊल ठेवता येईल अशा परिस्थितीत दोरी धरून चालत जाण्याची करावी लागणारी कसरत शिवाय हा कातळ डाईक या प्रकारात मोडत असल्याने संपूर्ण मोहीमच धोकादायक मानली जाते. अनावधानाने घडलेली छोटीशी चूकसुद्धा मृत्यूला कारणीभूत ठरू शकते. सहाजिकच गिर्यारोहण तंत्र आणि सुरक्षा साधनांशिवाय ही मोहीम शक्य होत नाही त्यामुळे प्रशिक्षित आणि अनुभवी गिर्यारोहकच यात सहभागी होत असतात.

मुठभर मावळ्यांच्या शौर्याने पराभूत झालेल्या मोगली सत्तेप्रमाणेच इंग्रज सत्ताही हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्थानांपासून भयभीत झाली होती. म्हणूनच या गडदुर्गांची मोडतोड करून त्यांनी इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला. पण काळ कितीही बदलला,तरी छत्रपतींच्या विचारांची मशाल विझली नाही. विझणार नाही. त्याच मशालीची धग उरात भरुन महाराष्ट्र भरातील दुर्गप्रेमी आज तेच गड सर करत आहेत. ही केवळ गडचढाई नसून इतिहासाशी साधलेला संवाद आणि स्वराज्याला अंत: करणापासून दिलेली मानवंदना आहे.

मिलिंद मधुकर जाधव,
दुर्गप्रेमी.

Exit mobile version