। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनी पोलीस ठाणे हद्दीत मोहपाडा परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी पतीसह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नानीवली चौक येथील एका 14 वर्षे 7 महिने वयाच्या मुलीवर मौजे खरबाची वाडी येथील तरूणाने संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही त्याने तिच्याशी ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर मोहपाडा येथील एका खोलीत तसेच मोरबे धरणाजवळील जंगल भागात बळजबरीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपीने खालापूर येथील आपल्या राहत्या घरीही वेळोवेळी अत्याचार करून पीडित मुलीला गर्भवती केल्याचे समोर आले आहे. ही बाब पीडित मुलीच्या आईसह इतर आरोपींना समजूनही त्यांनी मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही दुर्लक्ष केले. ती अल्पवयीन असतानाही तिचा सारसई, ता. पनवेल येथील कालिका माता मंदिरात बालविवाह लावून दिला. याबाबत रसायनी पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला असून, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार प्रमोद जाधव अधिक तपास करीत आहेत.







