राज ठाकरे यांनी स्पष्ट केली भूमिका
। मुंबई । प्रतिनिधी ।
मनसे लोकसभेची निवडणूक लढणार नाही, मात्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची राजकीय भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्पष्ट केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या निवडणुकींच्या कामाला लागा, असे आदेश देखील त्यांनी देत विधानसभा लढणार असल्याचे संकेत दिले. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याने इंडिया आघाडीसाठी हा फार मोठा धक्का असल्याचे बोलले जाते.
गुढीपाडवा निमीत्त मुंबई येथील शिवाजी पार्कवर मंगळवारी मनसेचा जाहीर मेळावा पार पडला. त्याप्रसंगी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. देशाला आज खंबीर नेतृत्वाची गरज आहे. मात्र, सध्या तरी असे नेतृत्व दिसत नसले, तरी मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी महायुतीला पाठिंबा देत आहे. मात्र चुकीचे काही झाले तर मी त्या विरोधात बोलणार असा, इशाराही त्यांनी यावेळी दिला. अमित शहा यांच्यासोबत झालेल्या भेटीबाबत चुकीच्या वावड्या उठवण्यात आल्या होत्या. मला शिवसेनेचा प्रमुख व्हायचे असते, तर तेव्हाच झालो असतो. मला शिवसेना फोडून प्रमुख व्हायचे नसल्याने मी माझा वेगळा पक्ष काढल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. इंजिन या चिन्हाबाबत कोणतीच तडजोड करणार नसून मनसे हा पक्ष वाढवणार आहे. भारत देश तरुणाचा सर्वात मोठा देश आहे. येथील तरुणांना चांगले शिक्षण, तंत्रज्ञान, व्यवसाय, नोकरीची आवश्यकता आहे. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांनी लक्ष द्यावे. अन्यथा देशाता आराजकता माजेल असा इशाराही त्यांनी दिला. ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्याबद्दल मी प्रशंसा केली आहे. ज्या गोष्टी पटल्या नाही, त्याला टोकाचा विरोध केल्याचे ते म्हणाले.
देशातून सहा लाखाहून अधिक उद्योगपतींनी भारत देश सोडला आहे. हे अतिशय गंभीर आहे, असेही ते म्हणाले. राज्यात चुकीचा कॅरम फुटल्याने कोण कोणत्या राजकीय पक्षात आहे हेच कळत नसल्याचा चिमटा ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्ट करताना काढला. निवडणुका होत असतात हे निवडणुक विभागाला माहिती असताना देखील शिक्षक, परिचारीका, डॉक्टर यांना निवडणुकीच्या कामाला जुंपत आहे. त्यांनी रुग्णांची सेवा करायची, मुलांना शिकवायचे की निवडणुकीची ड्युटी करायची. या पुढे निवडणुकीच्या कामाला जाऊ नका, तुम्हाला नोकरीतून कोण काढतो हे मी पाहतो, अशी टीका त्यांनी केंद्रीय निवडणुक आयोगवर केली.