अवकाळी पावसातच ठेकेदारांचा भांडाफोड; गटारात पडून सायकलस्वार जखमी
| कोलाड | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड-खांब रस्त्याला अवकाळी पावसातच तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातून मार्ग काढतांना प्रवासी वर्गाची तारांबळ उडत आहे. तर, खांब येथील निकृष्ट दर्जाच्या गटारात एक सायकलस्वार पडून किरकोळ जखमी झाला आहे. त्याला जबाबदार कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा भांडाफोड झाल्याचे प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला 18 वर्षांपूर्वी कामाला सुरूवात झाली असुन या महामार्गाचे काम अद्याप अपूर्णावस्थेतच आहे. 2018 पासून लोक प्रतिनिधींकडून फक्त तारीख पे तारीख देण्यात येत आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गाचे काम येत्या जुन अखेर पूर्ण होईल असे सांगितले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘कृषीवल’मधून मुंबई-गोवा महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे कोलाड येथील बाजारपेठेत पुराचा धोका निर्माण होणार असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्याचा प्रत्यय अवकाळी पावसातच बघायला मिळत आहे. कोलाड बाजारपेठेत व रेल्वेच्या पुलाखाली तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर, खांब नाक्यावरून उड्डाण पुलाच्या खाली देखील अवकाळी पावसातच मोठ्या प्रमाणात पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यातून मार्ग काढताना प्रवासी वर्गाची तारांबल उडत आहे.
त्याचबरोबर नडवली-कोलाड रस्त्यावर उड्डाण पुलाच्या खालून जाताना बँक ऑफ महाराष्ट्र समोर गटारासाठी मोठा खड्डा खोदून ठेवला आहे. या खड्ड्यात पडून अपघात होऊ शकतो. तर, दोन दिवसांपूर्वी एक सायकल स्वार या गटारात पडून किरकोळ जखमी झाला होता. त्यामुळे गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे मुंबई-गोवा महामार्गाचे काम पुर्ण होणे दुरच राहिले, परंतु, कोलाड-खांब येथील रस्ते व गटाराचे जे काम झाले आहेत ते निकृष्ट दर्जाचे असल्याचे अवकाळी पावसात दिसून येत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील खांब नाक्यावरील रस्त्याला जागोजागी पडलेले खड्डे पडले आहेत. त्यामुळे या नाक्यावर एक तास जरी पाऊस पडला तरी रस्त्यावर पाणीच पाणी भरून तलावाचे स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे हा रस्ता किती निकृष्ट दर्जाचा आहे हे दिसून येत आहे. तर, बँक ऑफ महाराष्ट्रच्या समोर गटारासाठी खड्डा खोदून ठेवला आहे. त्यामुळे बँकेत जाणारे किंवा इतरत्र जाणारे नागरिक या गटारात पडून जखमी होऊ शकतात. त्याला जबाबदार कोण?
मंगेश भोईर,
माजी सरपंच