तमिळनाडू उपांत्य फेरीत दाखल
| मुंबई | प्रतिनिधी |
विजय हजारे करंडकातील मुंबई क्रिकेट संघाचे आव्हान सोमवारी संपुष्टात आले. तमिळनाडू संघाने मुंबई संघावर 7 गडी व 40 चेंडू राखून विजय मिळवत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मुंबईकडून तमिळनाडू संघासमोर 228 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. तमिळनाडू संघाने अवघे तीन गडी गमावत हे लक्ष्य पार केले. बाबा अपराजित (45 धावा) व नारायण जगदीशन (27 धावा) या सलामी जोडीने 50 धावांची भागीदारी करताना आश्वासक सुरुवात करून दिली. या दोघांसह निशीश राजगोपाल (1 धाव) हा फलंदाज बाद झाल्यानंतर तमिळनाडूची अवस्था 3 बाद 103 धावा अशी झाली होती, पण बाबा इंद्रजीत (नाबाद 103 धावा) व विजय शंकर (नाबाद 51 धावा) या जोडीने नाबाद 126 धावांची भागीदारी करताना तमिळनाडूच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
याआधी जय बिस्ता (37 धावा), दिव्यांश सक्सेना (0), हार्दिक तामोरे (24 धावा), अजिंक्य रहाणे (1 धाव), शम्स मुलानी (27 धावा) या मुंबईकरांना अपयशाला सामोरे जावे लागले. अजिंक्यला या स्पर्धेमध्ये सूर गवसला नाही. प्रसाद पवारने 59 धावांची; तर शिवम दुबेने 45 धावांची खेळी केल्यामुळे मुंबईला 227 धावांपर्यंत मजल मारता आली.
विजय हजारे करंडकाच्या उपांत्य फेरीच्या लढती निश्चित झाल्या आहेत. हरियाना-तमिळनाडू व राजस्थान-कर्नाटक यांच्यात या लढती होतील. 13 व 14 डिसेंबरला हे सामने होतील.