। अलिबाग । प्रमोद जाधव ।
मुरूड हे पर्यटनाच्यादृष्टीने महत्वाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. परंतु याच मुरूडमधील एसटी बस आगार समस्यांच्या गर्तेत सापडल्याचे दिसून आले आहे. जुन्या गाड्यांसह स्थानक व आगाराच्या परिसरात गवत, काटेरी झुडपांनी विळखा घातला आहे. त्यामुळे प्रवाशांबरोबरच कर्मचार्यांची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रायगड जिल्ह्यातील मुरूड एक पर्यटनाच्यादृष्टीने महत्वाचे ठरत असताना, ऐतिहासिक ठिकाण म्हणून मुरूडची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. वर्षाला दोन लाखाहून अधिक पर्यटक मुरूडला भेटी देतात. येथील स्थानिक हॉटेल, कॉटेजेस, रेस्टॉरन्टबरोबरच अन्य स्थानिक व्यवसायिकांना रोजगाराचे साधन पर्यटनातून उपलब्ध होते. पर्यटकांची वर्दळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असते. मुरूडमध्ये पर्यटकांसह स्थानिकांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे एसटी बस आगार व स्थानक आहेत. या स्थानकातून मुंबईसह बोरीवली, ठाणे, स्वारगेट, पुणेे अशा अनेक लांब पल्ल्यासह रेवदंडा, अलिबाग, रोहा अशा अनेक तालुका व गावांच्या ठिकाणी बसेस सोडल्या जातात. शाळा, महाविद्यालयामध्ये जाणार्या येणार्यांची संख्यादेखील प्रचंड आहे. प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे चित्र दिसून आले आहे. स्थानकासमोर बस पार्कींग न करता, कोपर्यात झाडाच्या बाजूला वाहने पार्कींग केली जात असल्याचे चित्र आहे. स्थानकात माती, खडी, धुरळा असून फलाटासमोरच झुडूप वाढलेले आहे. मुरूड स्थानकात प्रवेश करताना प्रवेशद्वारासमोर असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या केबीनच्या परिसरात प्रचंड गवत वाढले आहे. कर्मचार्यांच्या निवासस्थानासह आगाराच्या परिसराताला गवत, काटेरी झुडपांनी विळखा घातला आहे. समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या आगारातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. प्रभारी व्यवस्थापक याकडे लक्ष देतील का, असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
प्रभारी आगार व्यवस्थापकांनी बोलणे टाळले
याबाबत मुरूडचे प्रभारी आगार व्यवस्थापक राहुल शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मोबाईलवर काहीच सांगू शकत नाही. त्यांनी प्रत्यक्ष या मग तुम्हाला याची माहिती दिली जाईल असे सांगून समस्यांच्या मुद्द्यावर बोलणे टाळणे.
आगाराला पूर्णवेळ व्यवस्थापकाची प्रतीक्षा
मुरूड एसटी बस आगारात गेल्या दीड वर्षापासून पूर्ण वेळ व्यवस्थापक नाही. त्यामुळे या आगारात अलिबाग एसटी बस स्थानकातील वाहतूक निरीक्षक राहुल शिंदे यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून मुरूड एसटी बस आगार व स्थानकाचा कारभार निरीक्षकाच्या भरोवश्यावर चालत आहे. या आगाराला पूर्ण वेळ व्यवस्थापकाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. याकडे एसटी महामंडळ लक्ष देईल का असा सवाल उपस्थित केला जात आहे.