। सुकेळी । वार्ताहर ।
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या आपल्या लाडक्या बाप्पांचे आगमन होण्यासाठी दोन दिवसच उरले आहेत. बाप्पांच्या स्वागतासाठी थोरा-मोठ्यांपासुन बच्चेकंपनीसह सर्वजण तयारीला लागले आहेत. गणरायाला लागणार्या विविध सजावटीच्या व पूजेसाठी लागणार्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसुन येत आहे.
नागोठणे बाजारपेठेत देखिल आकर्षक विद्युतमाळा, फुलांच्या माळांनी बाजारपेठेत दुकाने सजली आहेत. गणेशोत्सवानिमित्त घरोघरी गणपती बाप्पांची मूर्ती आवर्जून बसवली जाते. त्यासाठी आकर्षक सजावट केली जाते. सजावटीसाठी लागणारे कापडाची झालर, विविध आकाराची फुले, माळा, लाईटचे तोरण, गळ्यातील हार, मखर, पुजेचे व प्रसादाचे साहित्य आदि साहित्य विक्रीसाठी बाजारात आले आहेत. गोकुळाष्टमीपासुन पूजेच्या साहित्यांची खरेदीला सुरुवात झाली आहे. पुजेच्या वस्तु आणि साहित्यात थोड्याफार प्रमाणात भाव वाढसुद्धा झाली आहे. मात्र, याचा परिणाम खरेदीवर होणार नाही. तसेच यावर्षी ग्राहकांची संख्या वाढली आहे. व्यावसायिक चांगलेच खुश आहेत.