अलिबागच्या रंगकर्मीचे गार्हाणे,
पीएनपी नाट्यगृहात नटराज,रंगभूमी पूजन
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रंगभूमी,रंगदेवता आणि नाट्यरसिक यांना विनम्र अभिवादन करुन सादर करीत आहोत हे स्वर कानी पडल्यानंतर नाट्यगृहामध्ये होणारी तिसरी घंटा कानावर पडली की आपोआपच सारी नाट्यगृहे स्तब्ध व्हायची आणि क्षणार्धात मखमली पडदा वर जायचा आणि रंगमंचावर सादर व्हायचे नाटकांचे सादरीकरण,गाण्यांच्या मैफिली.पण कोरोनाने सारेच बंद झाले होते.आता मात्र नाट्यगृहांचे मखमली पडदे आता उघडणार असून,त्याचे औचित्य साधत अलिबागमध्येही रंगभूमी कलावंतांनी मंगळवारी ( 9 नोव्हेंबर) नटराज आणि रंगभूमीचे पूजन करुन रंगभूमी दिन पीएनपी नाट्यगृहात साजरा केला आणि नव्या दमाने कार्यक्रमांची नांदी केली.
अलिबागच्या सांस्कृतिक क्षेत्रात अनेक कलावंतांचे योगदान आहे.पण कोरोनाच्या साथीने या कलावंतांच्या कलाच लोप पावते की काय अशी भीती निर्माण झाली.ना नाटक,ना कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम,सारे कसं शांत शांत.नाट्य,सांस्कृतिक कलेवरच ज्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे अशा कलावंतांची आणि अन्य घटकांची अवस्था तर दयनीय अशी झाली होती.पण शेवटी नशिबाने साथ दिली.कोरोनाची साथ आटोक्यात आल्याने सरकारनेही निर्बंध उठविले आणि बंद असलेल्या नाट्यगृहांचे पडदे उघडण्यास राज्यकर्त्यांनीही अनुमती दिली.त्यामुळे मरगळलेल्या रंगकर्मींना दिलासा मिळाला.
याचेच औचित्य साधत अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहातही नाट्य रसिकांचे निखळ मनोरंजन करणार्या तसेच नट आणि प्रेक्षक यातील नातं घट्ट करणार्या तमाम रंगकर्मींना ममराठी रंगभूमी दिनाफच्या मनःपूर्वक शुभेच्छा देऊन पीएनपी नाट्यगृहात अलिबागच्या कलाकारांनी रंगभूमीचे पूजन केले. यावेळी नागेश कुळकर्णी, राजन पांचाळ,वसुंधरा पोखरणकर,श्रध्दा पोखरकण, सुनील ठोंबरे, संदेश मयेकर, राजू गुरव, प्रकाश सप्रे, योगेश पवार सचिन शिंदे, प्रतिक पानकर,सुजित पाटील,गौरांगी पाटील,प्रतिम सुतार, पुजा पाटील आदी कलावंत उपस्थित होते. तसेच उपस्थित कलावंतांनी सद्यस्थितीबाबत चर्चा करुन येणार्या कार्यक्रमांची माहितीही घेतली.
आमची सेवा गोड मानून घे
बा देवा म्हाराजा… आमची सेवा गोड मानून घे… जगावरचा कोरोनाचा संकट लवकर टळू दे रे म्हाराजा… बंद असलेली नाट्यगृह, सिनेमागृह पुन्हा चालू झालीत, त्यामध्ये सादर होणारे प्रयोग यशस्वी होऊ दे रे म्हाराजा… सगळ्या कलाकाराना काम मिळून ती चांगली करुन घे रे म्हाराजा… मायबाप रसिक प्रेक्षकांनी नाट्यगृह पुन्हा भरु दे रे म्हाराजा… कलाकारासोबतच सगळ्यावर जे वाईट परिस्थिती होती ती टळून चांगले दिवस येऊ दे म्हाराजा.. असे गार्हाणे ज्येष्ठ रंगकर्मी राजन पांचाळ यांनी घातले.
कोरोना परिस्थितीत आलेल्या वाईट अनुभवातून कलाकार व तंत्रज्ञ यांनी आपल्या नाट्यकलेसोबतच जोडधंदा सुरु ठेवावा.
नाट्यकर्मी अमरदिप ठोंबरे
यावेळी व्यावसायिक रंगभूमी व मालिकेत काम करताना व कोरोना परिस्थितीतील अनुभव व्यक्त करत यावर मात करून आपण लवकरच सर्व कलावंत पुन्हा उभे राहू असा विश्वास श्रद्धा पोखरणकर हिने दाखवला. तर प्रकाश सप्रे यांनी सद्यस्थितीत सादर होणारे अल्बम, शॉर्टफिल्म यावर भाष्य करत अजून मेहनती करत दर्जेदार कलाकृती निर्माण होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. सर्वाचे मुळ हे रंगभूमी आहे, त्यामुळे तिच्यासोबत प्रामाणिक रहा, नेहमी यशस्वी व्हाल. अशी अपेक्षाही व्यक्त केली. सोबतच आगामी होणार्या अनेक जिल्हा व राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा मध्ये सहभागी होण्यासाठी सर्वाना प्रोत्साहन द्या व एकमेकाला सहकार्य करत अलिबागकर म्हणून एकमेकाच्या पाठीशी उभे रहा,असे योगेश पवार म्हणाले