ग्रीन वर्कस् ट्रस्टने घेतला विद्यार्थ्यांसाठी पुढाकार
। आगरदांडा । प्रतिनिधी ।
ग्रीन वर्कस् ट्रस्ट व स्टेट बॅक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि महाराष्ट्र वनविभाग, ठाणे (वन्यजीव) यांनी पुढाकार घेऊन फणसाड वन्यजीव अभयारण्यात विद्यार्थ्यांना फणसाड वन्यजीव अभयारण्याच्या समृद्ध जैवविविधतेची ओळख करून देणे, निसर्ग आणि त्याच्या संवर्धनाबद्दल सहानुभूती आणि जागृती निर्माण करणे, वन्यजीव संरक्षणाच्या महत्वाविषयी मुलांचे प्रबोधन म्हणून निसर्ग शिक्षण सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
रायगड जिल्हा परिषद शाळाचे गटशिक्षण अधिकारी सुनील गवळी यांच्या अनुमतीने तळेखार, नांदगाव शाळा क्रं 1, मजगाव, चोरढे, वावे, वळके जीडीटी फ्यूचर स्कूल सुडकोली, माध्यमिक विद्यालय काशीद अशा 9 शाळांच्या 302 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. विद्यार्थ्यांना पक्षी, सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, कीटक आणि उभयचर प्राणी यांसारख्या विविध वन्यजीव प्रजाती निरीक्षण करण्याची आणि अभयारण्याच्या पर्यावरणाचे महत्व जाणून घेण्याची संधी मिळाली. याव्यतिरिक्त, या सहलीमध्ये वन्यजीवांना भेडसावणार्या धोक्यांचा आणि संवर्धनाच्या प्रयत्नांची महत्त्वपूर्ण भूमिका समाविष्ट करण्यात आली. आणि शिक्षण आनंददायी करण्यासाठी, शैक्षणिक मनोरंजक उपक्रम आणि अभयारण्यातील वनस्पती आणि प्राणी यांच्याशी संबंधित खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
वन्यजीव अभयारण्याच्या परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या आजूबाजूच्या समृद्ध जैवविविधतेची ओळख करून देणे हा होता. या सहली, ग्रीन वर्कस् ट्रस्टच्या शाश्वत फणसाड या प्रकल्पातील इको-बीज या उपक्रमांतर्गत,प्रकल्प व्यवस्थापक शिवानी पुजारी आणि कृपा पाटील यांनी सांगितले. ग्रीन वर्कस् ट्रस्टचे स्वयंसेवक दिपाली भोपळे, आकाश म्हैसधुणे, सोनम पाटील, मिनार साळवी, सर्वेश अभ्यंकर, अभिषेक माने, मानस बर्वे, रोहित वाघमारे, प्रगती वाघमारे, आदित्य सोमण, जान्हवी नाईक, सागर सातपुते आणि प्रथमेश मोकल यांनी निसर्ग मार्गाचे नेतृत्व केले. यावेळी महाराष्ट्र वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक मनोहर दिवेकर वन परिक्षेत्र अधिकारी, नारायण राठोड यांनी विद्यार्थ्यांना विनाशुल्क प्रवेशाची परवानगी दिली.