। पनवेल । वार्ताहर ।
नवी मुंबई मेट्रोचा वेग लवकरच वाढणार असून मेट्रोतील प्रवाशांना गारेगार सुस्साट प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. सध्या नवी मुंबई मेट्रोचा वेग सरासरी ताशी 25 प्रति किलोमीटर आहे. नुकतेच नवी दिल्लीच्या रेल्वे सुरक्षा विभागाने नवी मुंबई मेट्रोच्या बेलापूर ते पेणधर या पहिल्या मार्गिकेवरील वेगाची चाचणी केली आहे.
लवकरच नवी मुंबई मेट्रो ताशी 60 प्रति किलोमीटरने सुस्साट धावणार आहे. यामुळे मेट्रोने प्रवास करणार्यांना जलदगतीने अंतर कापता येणार आहे. नवी मुंबई मेट्रोला नुकतेच आयएसओ 9001 – 2015 हे मानांकन मिळाले आहे. मेट्रोला प्रतिताशी 80 किलोमीटरच्या वेगाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर सरळ मेट्रोच्या मार्गिकेवर जास्तीत जास्त प्रतिताशी 70 किलोमीटरच्या वेगाने मेट्रो धावू शकेल. मात्र, मेट्रोच्या वळण मार्गावर मेट्रोची गती कमी राहील. मेट्रोच्या वेगचाचणीचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर स्वयंचलित धावणारी संचलनाचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मेट्रोची गती वाढविली जाणार आहे. पुढील दीड महिन्यात वेग चाचणीचे प्रमाणपत्र मिळाण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर नवी मुंबई मेट्रोतून प्रवाशांना अवघ्या पंधरा मिनिटांत बेलापूर ते पेणधर या मार्गिकेवर प्रवास करता येईल.