काम तात्काळ न केल्यास आंदोलनाचा इशारा
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील निजामपूर मस्जिद मोहल्ला येथील खचलेल्या रस्त्याकडे ग्रामपंचायतीने पूर्णतः दुर्लक्ष केल्याची तक्रार येथील ग्रामस्थ लियाकत जालगावकर यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. सदरच्या रस्त्याची समस्या ग्रामपंचायतीने तात्काळ न सोडविल्यास आंदोलन करण्यात येईल असा गर्भित इशारा ग्रामस्थ लियाकत जालगावकर व सहकाऱ्यांनी दिला आहे. निजामपूर मोहल्ल्यातील खचलेला हा रस्ता रायगडकडे जात असून, या रस्त्याची समस्या अत्यंत बिकट आहे.
या रस्त्याच्या प्रश्नाबाबत जालगावकर यांनी ग्रामपंचायतीला जुलै 2025 मध्ये सुरवातीला लेखी स्वरूपात तक्रार अर्ज ही दिला आहे. जालगावकर यांच्या घरासमोरील हा रस्ता खचला आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत असून, अनेकवेळा ही वाहने जालगावकर यांच्या संरक्षक भिंतीला (कंपाऊंड वॉल) घासतात त्यामुळे कंपाऊंड वॉलचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय या रस्त्यावरील तुटलेल्या जाळ्यांनमुळे तेथील रहिवाशांना आणि वाहनाना ते त्रासदायक ठरत असून, या मार्गावरून जाणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनाही या जाळ्यांमुळे दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रश्नाकडे भागातील कोणीच लोकप्रतिनिधी अथवा ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याने जालगावकर यांनी तक्रार अर्जात म्हटले असून आमच्या मालमत्तेची तसेच काही अन्य घटना घडली तर याला निजामपूर ग्रामपंचायत जबाबदार असेल असे सांगत लवकरात लवकर हा प्रश्न ग्रामपंचायतीने मार्गी लावावा अन्यथा ग्रामपंचायत ठिकाणी उग्र आंदोलन करण्याचा इशारा जालगावकर यांनी प्रसार माध्यमांजवळ बोलताना दिला.







